सिनेमागृहांच्या पिचवर क्रिकेटची फटकेबाजी

By संजय घावरे | Published: June 8, 2024 08:20 PM2024-06-08T20:20:00+5:302024-06-08T20:20:12+5:30

मोठ्या पडद्यावर भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याचा 'हाऊसफुल' शो.

Cricket batting on the cinema pitch | सिनेमागृहांच्या पिचवर क्रिकेटची फटकेबाजी

सिनेमागृहांच्या पिचवर क्रिकेटची फटकेबाजी

 मुंबई - जगभरातील क्रिकेटप्रेमींचे लक्ष सध्या टी-ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेकडे लागले आहे. स्पर्धा सुरू झाल्यापासून सिनेमागृहांच्याही पिचवर क्रिकेटची फटकेबाजी सुरू आहे. या स्पर्धेतील 'भारत विरुद्ध पाकिस्तान' सामना मोठ्या पडद्यावर पाहाण्यासाठी क्रिडाप्रेमींनी सिनेमागृहांची वाट धरली आहे. बऱ्याच सिनेमागृहांमध्ये क्रिकेटचा शो जवळपास 'हाऊसफुल' झाल्याचे चित्र आहे.

यंदा अद्याप कोणताही सिनेमा ब्लॅाकबस्टर न झाल्याने तसेच मागील काही दिवसांपासून मोठा चित्रपट प्रदर्शित न झाल्याने अवकळा आलेली सिनेमागृहे टी-ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेमुळे गजबजू लागली आहेत. काहीशी दुष्काळी परिस्थिती अनुभवत असलेल्या चित्रपटगृहांना सध्या जुन्या गाजलेल्या चित्रपटांसोबतच टी-ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा आधार आहे. यातील अत्यंत चुरशीचा 'भारत विरुद्ध पाकिस्तान' हा सामना पाहण्यासाठी प्रेक्षक मोठ्या पडद्याला पसंती देत आहेत. ज्यांना स्टेडिअमवर हा सामना पाहणे शक्य नाही, ते सिनेमाच्या मोठ्या पडद्यावर या सामन्याचा आनंद लुटत आहेत. यासाठी मल्टिप्लेक्सपासून एक पडदा सिनेमागृहांपर्यंत जणू सर्वांनीच प्रेक्षकांसाठी जणू रेड कार्पेट अंथरले आहे. '२डी हिंदी' आणि '२डी इंग्रजी' असे क्रिकेट सामन्यांचे विभाजन करण्यात आले आहे. पीव्हीआर, मुव्हीटाईम, आयनॅाक्स, मुक्तापासून चित्रा, स्टर्लिंगसारख्या एक पडदा चित्रपटगृहांनीही क्रिकेट सामन्यांना प्राधान्य दिले आहे. संध्याकाळी ७ वाजल्यापासून सिनेमाच्या पडद्यावरही क्रिकेट विश्वचषकाचा फिव्हर चढत असल्याचे पाहायला मिळत आहे. यासाठी साधारणपणे २२० रुपयांपासून पुढे ३०० रुपये, ३५० रुपये, ४५० रुपये, ५०० रुपये ते १२०० रुपयांपर्यंत तिकिट दर आहे. पीव्हीआरमध्ये कमीत कमी तिकिट दर ६०० रुपये असून, रिक्लायनर तिकिट १३०० रुपये आहे. काही सिनेमागृहांमध्ये ८० टक्क्यांपेक्षा अधिक बुकींग झाल्याने सामना सुरू होईपर्यंत शो हाऊसफुल होईल. स्टेडिअममध्ये जसे प्रेक्षक भारतीय क्रिकेट संघाची ब्ल्यू जर्सी परिधान करून चेहऱ्यावर तिरंगा रेखाटून जातात, तसे सिनेमागृहांमध्येही गर्दी करणार आहेत. 

टी-ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेने सिनेमागृहांना एक प्रकारे आधार देण्याचे काम केले असून, मागील काळात चित्रपटांकडे पाठ फिरवलेल्या प्रेक्षकांची पावले संध्याकाळच्या वेळेत सिनेमागृहांची वाट धरू लागल्याचे चित्रपट व्यवसाय तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या निमित्ताने खाद्यपदार्थांच्या विक्रीतही वाढ होत असून, भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याचे प्रचंड क्रेझ असल्याचे सिनेमागृहांशी निगडीत असलेल्या सूत्रांनी सांगितले. 
.........................
मोठा चित्रपट नाही...
या आठवड्यात 'मुंजा', 'मल्हार', 'बजरंग और अली', 'फूली' या हिंदी चित्रपटांच्या जोडीला 'बॅड र्बाईज : राईड आॅर डाय' हा इंग्रजी चित्रपट रिलीज झाला आहे. याखेरीज 'ब्लॅकआऊट' हा हिंदी चित्रपट डिजिटली रिलीज झाला आहे.
.......................
जुन्या चित्रपटांचा आधार...
चित्रपटगृहांना सध्या 'जिंदगी ना मिलेगी दोबारा', 'तमाशा', 'रॅाकस्टार', 'दिल धडकने दो', 'तुंबाड', 'गली बॅाय', 'तलाश' आदी जुन्या हिंदी चित्रपटांचा आधार आहे. याखेरीज 'जुनं फर्निचर' व 'नाच गं घुमा' हे मराठी चित्रपटही सुरू आहेत.

Web Title: Cricket batting on the cinema pitch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई