Lokmat DIA 2021: क्रिकेट कॉमेन्टेटर हर्षा भोगले यांचा लोकमत बेस्ट स्पोर्ट्स डिजीटल इन्फ्लूअन्सर’ पुरस्कारानं गौरव
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2021 01:48 PM2021-12-02T13:48:58+5:302021-12-02T13:50:51+5:30
Lokmat Digital Influencer Award 2021: गेली तीन दशकं हर्षा भोगले क्रिकेट समालोचन करताहेत. आकाशवाणी, ऑस्ट्रेलियन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन, बीबीसी, ईएसपीएन, स्टार स्पोर्टस यासारख्या प्रतिष्ठित वाहिन्यांवरचे ते ‘स्टार कॉमेन्टेटर’ ठरलेत.
मुंबई - भारत हा क्रिकेटवेड्यांचा देश. इथे क्रिकेट खेळणारे गल्लोगल्ली, घरोघरी आहेतच, पण भारतात क्रिकेट हा खेळण्यापेक्षा बोलण्याचा विषय आहे, असं पुलंनी म्हटलं होतं ते तर पदोपदी जाणवतं. पण काही जणांचं क्रिकेटबद्दलचं बोलणं ऐकत राहावंसं वाटतं. कारण ते ओघवतं असतं, अभ्यासपूर्ण असतं, जिवंत असतं. असं एक मराठमोळं नाव म्हणजे हर्षा भोगले. हर्षा भोगले यांच्या क्रिकेट कॉमेंट्रीचे सगळेच फॅन आहेत. स्वत:चा वेगळा ढंग अन् अनोखी शैली यामुळे नावारुपाला आलेले हर्षा भोगले(Harsha Bhogale) यांना आज लोकमतकडून ‘बेस्ट स्पोर्ट्स डिजीटल इन्फ्लूअन्सर’(Lokmat Best Sports Influencer Award 2021) या पुरस्काराने गौरवण्यात आलं.
गेली तीन दशकं हर्षा भोगले क्रिकेट समालोचन करताहेत. आकाशवाणी, ऑस्ट्रेलियन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन, बीबीसी, ईएसपीएन, स्टार स्पोर्टस यासारख्या प्रतिष्ठित वाहिन्यांवरचे ते ‘स्टार कॉमेन्टेटर’ ठरलेत. एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नसतानाही, क्रिकेटमधील विक्रमवीरांसोबत त्यांच्या तोडीचं समालोचन करणारा हा एकमेव शिलेदार आहे. तो मराठी असल्यानं आपल्याला त्याच्याबद्दल अधिकच आदर-अभिमान आहे. इतकी वर्षं आपल्या समालोचनातून त्यांनी क्रिकेटप्रेमींना भरभरून हर्ष दिलाय, प्रचंड माहितीही दिलीय. एका उच्चविद्याविभूषित, सुसंस्कृत घरातून आलेल्या भोगलेंमधील नम्रतेचा, विनयाचा प्रत्यय तर अगदी सहज येतो.
तेलंगणाच्या हैदराबाद इथं एका मराठी कुटुंबात जन्मलेल्या हर्षा भोगले यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेटच्या दुनियेत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांचे बालपण हैदराबाद इथेच गेले. त्यांचे वडील एडी भोगले हे प्रोफेसर होते. तर आई शालिनी भोगले या साइकोलॉजीच्या प्राध्यापिका होत्या. हैदराबाद पब्लिक स्कूल इथं शालेय शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी उस्मानिया यूनिवर्सिटीतून केमिकल इंजिनिअरींगची पदवी घेतली. त्यानंतर IMA मध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केले. पदवीचं शिक्षण घेत असतानाच जवळपास २ वर्ष त्यांनी कामही केले. तेव्हा एका स्पोर्ट्स मॅनेजमेंट कंपनीसोबत ते जोडले गेले.
हर्षा भोगले यांना क्रिकेटची खूप आवड होती. APCA चे खेळाडू म्हणून छोट्या पातळीवर त्यांच्या करिअरची सुरुवात झाली. वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी आकाशवाणीत कमेंट्री देण्याचं काम हर्षा भोगले यांनी केले. त्यानंतर त्यांनी कमेंट्री सुरुच ठेवली. हर्षा भोगले यांची कमेंट्री लोकांना आवडू लागली. परंतु १९९२ च्या भारत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावेळी हर्षा भोगले यांना खरी ओळख मिळाली. त्यावेळी भारतीय ब्रॉडकास्टर्स ओवरसीज दौऱ्यावर जाण्यासाठी फारसा रस दाखवत नसे. तेव्हा हर्षा भोगले यांनी ऑस्ट्रेलिया ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनसोबत करार केला. या कंपनीसोबत काम करणारे हर्षा भोगले हे पहिले भारतीय कमेंटेटर बनले. त्यानंतर त्यांचा आवाज जगात पोहोचला. हर्षा भोगले यांनी आतापर्यंत ५०० हून अधिक आंतरराष्ट्रीय सामन्यात कमेंट्री केली आहे. यात जवळपास ४०० वन डे, १०० टेस्ट आणि टी-२० मॅचचाही समावेश आहे. IPL च्या सहाही सीजनमध्ये हर्षा भोगले यांच्या आवाजाची जादू चालली.