Sachin Tendulkar Smile Ambassador । मुंबई : भारतीय संघाचा माजी खेळाडू आणि दिग्गज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरवरमहाराष्ट्र सरकारने एक मोठी जबाबदारी सोपवली आहे. तेंडुलकरची मंगळवारी महाराष्ट्राच्या 'स्वच्छ मुख अभियाना'चा 'स्माइल ॲम्बेसेडर' म्हणून निवड करण्यात आली. खरं तर ही तोंडाच्या स्वच्छतेच्या प्रचाराशी संबंधित एक मोहीम आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी सचिन तेंडुलकरसोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. त्यामुळे सचिन तेंडुलकर पुढील पाच वर्षांसाठी या अभियानाचा 'ब्रँड ॲम्बेसेडर' असणार आहे. 'स्वच्छ मुख अभियान' हे 'इंडियन डेंटल असोसिएशन'ने तोंडाची स्वच्छता सुधारण्यासाठी आणि लोकांना त्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी सुरू केलेले राष्ट्रीय अभियान आहे.
'स्वच्छ मुख अभियान' काय संदेश देतं?'स्वच्छ मुख अभियान' हे लोकांच्या जनजागृतीसाठी कार्यरत राहणार आहे. यातून प्रमुख पाच संदेश दिले जातील. यामध्ये ब्रश करणे, तोंड स्वच्छ धुणे, स्वच्छ अन्न खाणे, सिगारेट पिणे टाळणे आणि वर्षातून किमान दोनदा दंतचिकित्सकाकडे जाणे हे पाच प्रमुख संदेश या अभियनाअंतर्गत दिले जातील. याचाच प्रचार सचिन तेंडुलकर करणार आहे.