मुंबई: क्रिकेट टीममध्ये निवड न झाल्याच्या निराशेत कुरारमधील करण तिवारी (२८) या तरुणाने सोमवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी त्याच्या शेजारी राहणाऱ्या मित्राला त्याने आत्महत्येबाबत व्हॉट्सअॅप मेसेज केला होता. मात्र मित्राने तो उशिरा पाहिला; अन्यथा करणला वाचविता आले असते, अशी हळहळ मित्राने व्यक्त केली.करण सोमवारी रात्री त्याच्या घराजवळच राहणाऱ्या मित्रासोबत रात्री सव्वानऊ वाजेपर्यंत गप्पा मारत होता. त्या वेळी तो चांगला हसतखेळत होता. त्यानंतर घरी गेल्यानंतरही व्हॉट्सअॅपवर काही वेळ दोघांनी चॅटिंग केले. त्यानंतर १० वाजून १० मिनिटांनी करणने त्याला आत्महत्येविषयी मेसेज केला. तो त्याने १० वाजून ४५ मिनिटांनी वाचला. तो अनेकदा आत्महत्येविषयी बोलत असे. मात्र, ते सर्व मस्करीत सुरू असायचे, असे मित्राने सांगितले. वेळेत मेसेज वाचला असता तर कदाचित त्याला वाचविता आले असते, अशी खंत मित्राने व्यक्त केली.करणच्या आईने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्या रात्री तो त्यांच्याशी व्यवस्थित बोलला. जेवून झाल्यानंतर झोपायला जातो, असेही त्याने आईला सांगितले. त्यामुळे तो आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलेल असे कोणालाच वाटले नाही. कुरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबासाहेब साळुंखे यांनी सांगितले की, आतापर्यंत करणच्या दोन मित्रांचे जबाब नोंदविण्यात आले असून या प्रकरणी कुटुंबीयांनी कोणावरही संशय नसल्याचे स्पष्ट केले. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.
कुरार क्रिकेटपटू आत्महत्या: "मेसेज वाचला असता तर बरे झाले असते!"
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2020 1:07 AM