मीरारोड - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक तथा व्यावसायिक असलेल्या जय शुक्ला यांच्या फसवणूक केल्याच्या तक्रारीवरून भाजपाच्या माजी आमदारासह एकूण ८ जणांविरुद्ध काशीमीरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
मीरारोड मध्ये राहणारे जय व त्यांचे वडील चंद्रप्रकाश हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असून जय यांचा रियल इस्टेट चा व्यवसाय आहे. घोडबंदर येथील सर्व्हे क्रमांक २० च्या ५ व ७ या हिश्यात सैफी पार्क नावाने २१ मजल्याचा गृह प्रकल्प तयार केला जाणार असल्याचे सांगत राज डेव्हलपर्स एन्ड बिल्डर्स नावाच्या बांधकाम व्यवसायिक कंपनीच्या भागीदारांनी शुक्ला यांना गुंतवणूक करण्यास सांगितले होते. या बदल्यात त्यांना इमारतीतील फ्लॅट व गाळे विक्रीचे अधिकार आणि एका फ्लॅटच्या विक्रीवर प्रति चौरस फूट १ हजार रुपये व दुकानाच्या विक्रीवर ३ हजार रूपये असा हिस्सा देण्याचा व्यवहार झाला.
गुंतवणूक केल्यानंतर तीन महिन्यात सर्व परवानगी प्राप्त करत इमारतीचे बांधकाम सुरू केले जाईल, असे सांगण्यात आले होते. त्यानुसार शुक्ला यांनी कंपनीचे नावे २ कोटी ४९ लाख रुपयांची गुंतवणूक २०१८ मध्ये करत तसा करार केला होता. याशिवाय शुक्ला यांनी त्यांच्या परिचयातील अन्य काही गुंतवणूकदारांना सांगितले असता त्यांनीसुद्धा सुमारे ३ कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. इमारतीचे काम रखडले व वादविवाद सुरू झाल्याने शुक्ला यांनी आपले व गुंतवणूकदार यांचे पैसे परत करण्याची मागणी सातत्याने कंपनीच्या भागीदारांकडे सुरू केली. परंतु, गुंतवलेले पैसे मिळत नसल्याने शुक्ला यांनी पोलिसात तक्रार केली. त्यातच कंपनी भागिदारांनी तुफेल राही बरोबर २ कोटी व त्यानंतर भाजपाचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्या सेव्हन इलेव्हन कंस्ट्रक्शन कंपनीसोबत व्यवहार चालवल्याची माहिती शुक्ला यांना मिळाली.
दरम्यान ६ जानेवारी रोजी नरेंद्र मेहता यांनी त्यांच्या कार्यालयात शुक्ला यांना बोलावले. शुक्ला व त्यांचे वडील मेहतांच्या कार्यालयात गेल्यावर त्यांनी हे प्रकरण संपवून टाका अन्यथा काहीच मिळणार नाही, असे सांगत धमकावले व दबाव टाकला. आपले पैसे राज डेव्हलपर्स कडून परत मिळाले नसतानाच ती जमीन ही सेव्हन इलेव्हन कन्स्ट्रक्शन कंपनीने नोंदणी करारनामा करून खरेदी केल्याचे कळाले. मेहता व त्यांची कंपनी आणि राज डेव्हलपर्सच्या भागीदारांनी संगनमताने आपली फसवणूक केल्याचा आरोप शुक्ला यांनी केला.
सोमवारी रात्री मीरारोड पोलिसांनी परस्पर दोघांना आरोपी बनवत गुन्हा दाखल करण्यास घेतला. हे प्रकरण दाबण्याचा प्रकार असल्याचा आरोप करत तसेच फोनवरून दबाव व धमक्या दिल्या जात असल्या प्रकरणी शुक्ला यांनी तक्रार केली. मंगळवारी पोलीस आयुक्त सदानंद दाते यांनी प्रकरण गांभीर्याने घेतले. मीरारोड पोलीस ठाण्यातील काही पोलिसांची चौकशीचे आदेश देतानाच सायंकाळी शुक्ला यांची फिर्याद काशीमीरा पोलिसांनी घेत गुन्हा दाखल केला.
राज बिल्डर्स आणि डेव्हलपर्सचे भागीदार
मुस्तली सिधपुरवाला, हातीम मियाझीवाला, मलिक मियाझीवाला, मोहम्मद मियाझिवाला, हुझेफा सिधपुरवाला सह इस्टेट एजंट लोकेश पांडे , सेव्हन इलेव्हन कन्स्ट्रक्शन कंपनी चे संजय सुर्वे व भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
राज डेव्हलपर्सच्या भागीदारांनी शुक्ला व गुंतवणूकदारांकडून पैसे उकळून इमारत बांधण्या ऐवजी जमीनच संगनमत करून सेव्हन इलेव्हन कंस्ट्रक्शन कंपनीला विक्री करून फसवणूक केल्याचा हा प्रकार आहे.