अनधिकृत होर्डिंग्जविषयी सेना कार्यकर्त्यांवर गुन्हा

By admin | Published: May 3, 2015 05:36 AM2015-05-03T05:36:51+5:302015-05-03T05:36:51+5:30

अनधिकृत होर्डिंग लावून शहर विद्रुप केल्याचा ठपका ठेवत तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले आहेत.

Crime against Army workers for unauthorized hoardings | अनधिकृत होर्डिंग्जविषयी सेना कार्यकर्त्यांवर गुन्हा

अनधिकृत होर्डिंग्जविषयी सेना कार्यकर्त्यांवर गुन्हा

Next

नवी मुंबई : अनधिकृत होर्डिंग लावून शहर विद्रुप केल्याचा ठपका ठेवत तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. शिवसैनिकांना धमकी देणाऱ्यांवर अदखलपात्र गुन्हा व धमकीचा निषेध केला म्हणून दखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या कारवाईविषयी परिसरातील नागरिकांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
निवडणुकीचा निकाल लागल्यापासून नवी मुंबईमध्ये सुडाचे राजकारण सुरू झाले आहे. ज्यांनी विरोधात काम केले त्यांना धमकावले जात आहे. तुर्भे- इंदिरानगरमधील शिवसेनेचे शाखाप्रमुख महेश कोठीवाले यांना राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी फोन करून धमकी दिली होती. आतापर्यंत तुम्ही आमच्याविरोधात खूप काम केले. आता परिसरात कसे फिरतो तेच पाहतो, असे सुनावले होते. याविषयी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तुर्भे एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये रीतसर तक्रार दिली होती. पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल करून घेतला. यानंतर शहरात विविध ठिकाणी सुरू असलेल्या धमकीसत्राविषयी वर्तमानपत्रामध्ये आलेल्या बातमीचे होर्डिंग इंदिरानगरमध्ये लावण्यात आले होते. या होर्डिंगवरून पुन्हा राजकारण सुरू झाले आहे.
दुकानदाराने केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी शिवसेना शाखाप्रमुख महेश कोठीवाले व इतर दोघांवर शहर विदु्रपीकरणाचा ठपका ठेवून गुन्हा दाखल केला आहे. या सर्वांना शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले असून त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. नवी मुंबईमध्ये निवडणुकीचा निकाल लागल्यापासून २ हजारपेक्षा जास्त अनधिकृत होर्डिंग्ज लावण्यात आली आहेत. तुर्भे एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्येही मोठ्या प्रमाणात होर्डिंग्ज लावण्यात आली आहेत. यानंतर फक्त एकाच होर्डिंगवर शहर विद्रुपीकरणाचा ठपका का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
दुकानदारांनी केलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केल्याचे उत्तर पोलीस देत आहेत. परंतु प्रत्यक्षात सदर ठिकाणी शिवसेनेचे पदाधिकारी यापूर्वीही होर्डिंग लावत आले आहेत. मग यावेळीच आक्षेप घेण्याचे कारण काय. तुर्भे परिसरातील राष्ट्रवादीच्या एका नेत्याने दबाव आणल्यामुळे हा प्रकार घडला असल्याची चर्चा सुरू झाली आहे. निवडणूक निकालापासूनच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना लक्ष्य करण्यास सुरुवात झाली आहे.
भविष्यात पदाधिकाऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्याचे सत्र सुरू राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी कोणाच्याही दबावाला बळी न पडता निष्पक्षपणे काम करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. गुन्हा दाखल केलेल्या महेश कोठीवाले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, आमचा पोलीस किंवा इतर कोणावरही आक्षेप नाही. आम्ही प्रामाणिकपणे या परिसरात पक्षाचे काम करत आहोत. आतापर्यंत राजकीय पक्षांमध्ये कधी तेढ निर्माण झाली नाही. परंतु आता जाणीवपूर्वक आम्हाला लक्ष्य केले जात असून असे प्रकार होऊ नयेत एवढीच आमची मागणी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)

Web Title: Crime against Army workers for unauthorized hoardings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.