दिशा सालियन प्रकरणात राणे पिता-पुत्राविरोधात गुन्हा; नाहक बदनामीचा कुटुंबीयांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2022 05:57 AM2022-02-28T05:57:38+5:302022-02-28T05:58:53+5:30

दिशाची बदनामी होत असल्याचा आरोप करत तिच्या कुटुंबीयांनी मालवणी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली आहे.

crime against bjp leaders narayan rane and nitesh rane in disha salian case | दिशा सालियन प्रकरणात राणे पिता-पुत्राविरोधात गुन्हा; नाहक बदनामीचा कुटुंबीयांचा आरोप

दिशा सालियन प्रकरणात राणे पिता-पुत्राविरोधात गुन्हा; नाहक बदनामीचा कुटुंबीयांचा आरोप

Next

लोकमत न्यूज नेटवर्क  

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियनची बलात्कारानंतर हत्या करण्यात आली, असा वारंवार दावा करणे केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि  त्यांचे पुत्र आमदार नितेश राणे यांना महागात पडले आहे. दिशाची बदनामी होत असल्याचा आरोप करत तिच्या कुटुंबीयांनी मालवणी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली आहे. त्यानुसार मालवणी पोलिसांनी शनिवारी राणे पिता-पुत्राविरोधात गुन्हा नोंदवला. 

दिशाची आई वसंती सालियन (५२) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार एप्रिल - मे २०२० दरम्यान दोन डील्स रद्द होऊन झालेल्या तोट्यामुळे दिशा निराश होती. तसेच तिला वेळोवेळी याबाबत समजावले होते. त्यानंतर जाहिरातीच्या शूटिंगच्या कामानिमित्त ४ जून रोजी मित्र रोहनसोबत त्याच्या मालाड येथील निवासस्थानी गेले. तेथेच ८ जून रोजी मित्र इंद्रनीलचा वाढदिवस साजरा केला. त्याच रात्री ८ वाजता दिशासोबत बोलणे झाले होते. 

त्यादरम्यान ती तणावात असल्याने तिला समजावले. त्याच रात्री दीडच्या सुमारास  तिने इमारतीवरून उडी घेत आत्महत्या केली. याचा पोलिसांनी व्यवस्थित तपास केला. तसेच आमचा कुणावरही संशय नसल्याचेही आम्ही सांगितले. 

तरीदेखील १९ फेब्रुवारी रोजी नारायण राणे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत, दिशावर बलात्कार करत तिची हत्या करण्यात आली, असे वक्तव्य केले. त्यांनी केलेल्या विधानाला नितेश राणे यांनी दुजोरा देऊन समाज माध्यमांवर दिशाची प्रतिष्ठा व चारित्र्यहनन करणारी वक्तव्ये केली. त्यामुळे मुलीची बदनामी होत असून, आम्हाला सन्मानाने जगता येत नसल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. मालवणी पोलिसांनी कलम २११, ५००,५०४, ५०६ (२), ३४ सह ६७ माहिती तंत्रज्ञान अधिनियम कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
 

Web Title: crime against bjp leaders narayan rane and nitesh rane in disha salian case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.