धुळ्यातील नामवंत डॉकटर पिता-पुत्रीविरुद्ध गुन्हा

By मनीषा म्हात्रे | Published: October 16, 2023 07:17 PM2023-10-16T19:17:51+5:302023-10-16T19:18:11+5:30

बनावट जात प्रमाणपत्रावर सीट मिळविल्याचा आरोप

crime against famous doctor father and daughter in dhule | धुळ्यातील नामवंत डॉकटर पिता-पुत्रीविरुद्ध गुन्हा

धुळ्यातील नामवंत डॉकटर पिता-पुत्रीविरुद्ध गुन्हा

मनीषा म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : धुळ्यातील नामवंत डॉकटर अनिल रघुवंशी आणि त्यांची मुलगी डॉ. अंतरा रघुवंशी विरोधात बनावट जात वैधता प्रमाणपत्रावर आरक्षित सीट मिळवल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बोगस प्रमाणपत्रामुळे हक्काची सीट गेल्याने डॉकटरने पोलिसांत धाव घेतल्यानंतर हे प्रकरण समोर आले. सायन पोलिस या प्रकरणी तपास करत आहेत.

कल्याण परिसरात राहणारे डॉक्टर जगदिश मुरलीधर राठोड (५१) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २०२२ मध्ये नीट पीजी पदव्युत्तर सामाईक परीक्षा दिली. निकालानंतर भारतात २५४९८ क्रमांक आला. त्यावेळी आधी व नंतर असलेल्या विद्यार्थ्यांची लिस्ट बघितली. त्यामध्ये डाॅ. अंतरा या विमुक्त भटक्या प्रवर्गातील नसल्याची खात्री झाली. दोघांमध्ये एकूण १६ विमुक्त जात प्रवर्गातील विद्यार्थी होते. त्यामध्ये एक विद्यार्थी अपात्र झाला, तर १५ पैकी फक्त ३ विद्यार्थ्यांना पीजीकरिता सीट मिळाली. रघुवंशी हे आडनाव विजा अ प्रवर्गात येत नसल्याने सायन वैद्यकीय महाविद्यालय येथे आरटीआय अंतर्गत माहिती मागवली. तेव्हा, या विद्यार्थिनीने एमबीबीएस केले होते.

आरटीआय मधून जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र यांच्या छायांकित प्रति मिळालया. त्यानुसार, वयाच्या चौथ्या वर्षी जात प्रमाण पत्र आणि वयाच्या सातव्या वर्षी जात वैधता प्रमाणपत्र तिने मिळविल्याचे समोर आले. जात वैधता प्रमाणपत्र दहावी पास झाल्यानंतरच मिळते. माझ्यासह अखिल भारतीय बंजारा सेना अध्यक्ष राजेश फकिरा राठोड  यांनी सीईटी सेल कमिशनरला तक्रार केली. त्यानुसार, चौकशीचे पत्र काढले.  चौकशीत, जातवैधता प्रमाणपत्र हे जिल्हा जातप्रमाणपत्र पडताळणी समिती नाशिक यांच्या अभिलेखी नोंद नसल्याचे समोर आले. चौकशीचा ससेमिरा मागे लागताच, अंतरा रघुवांशी हिने  मॉप अप  राऊंड झाल्यानंतर एमडीची सीट सोडली.

डाॅ. अनिल रघुवंशी व अंतरा रघुवंशी यांनी संगनमताने बनावट जात वैद्यता / पडताळणी प्रमाणपत्राचा वापर करून अंतरा रघुवंशी हिने प्रवेश घेतल्यामुळे पुढील वैद्यकीय शिक्षणापासून वंचित रहावे लागल्याचा आरोप तरुणाने केला आहे. अखेर, याप्रकरणी पुरावे हाती लागताच त्याने पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार, याप्रकरणी सायन पोलिसांनी गुन्हा नोंदवत अधिक तपास करत आहे.

सखोल चौकशी व्हावी

याप्रकरणी अंतरा यांच्यासह त्यांच्या वडिलांच्या कागदपत्रांची सखोल चौकशी होण्याची मागणी तक्रारदार डॉक्टर जगदिश मुरलीधर राठोड (५१) यांनी केली आहे. 

 

Web Title: crime against famous doctor father and daughter in dhule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.