मुंबई : संपत्तीच्या वादातून मंगेश राजाराम आणेराव (४०) याने पोटच्या मुलीची हत्या करून स्वत: आत्महत्या केल्याच्या घटनेनंतर, पोलिसांनी त्याचे वडील, भाऊ आणि वहिनीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात भाऊ नरेंद्रला रविवारी बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. या प्रकरणात लवकरच वडील आणि वहिनीलाही अटक करण्यात येणार आहे, शिवाय या प्रकरणात मुलींची विष पाजून हत्या केल्याप्रकरणी मंगेशविरुद्धही हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घर विकण्यासाठी नरेंद्र आणि त्याची पत्नी सारिका मंगेशवर दबाव आणत होते, तसेच सुसाइट नोटमध्ये लिहिलेल्या माहितीत त्याने, ‘आईच्या कर्करोगाच्या उपचारावर माझे सर्व पैसे संपले. अशात भाऊ, वहिनी आणि वडील मला मानसिक त्रास देत आहेत आणि मला घर रिकामे करण्यास सांगत आहे. अशात मी कुठे जाऊ?’ त्यामुळे तेच माझ्या मृत्यूला जबाबदार असतील, असे त्यामध्ये नमूद करण्यात आले आहे. नरेंद्रच्या अटकेपाठोपाठ सारिका आणि राजारामलाही लवकरच अटक करण्यात येणार असल्याची माहिती साकिनाका पोलिसांनी दिली. सध्या तरी या दोघांचा यामध्ये कसा सहभाग होता, याबाबत चौकशी सुरू आहे. त्यातून जे सत्य समोर येईल. त्यानुसार, पुढील कारवाई केली जाईल. प्राथमिक तपासात सुसाइड नोटमुळे सारिका आणि राजारामलाही यामध्ये आरोपी करण्यात आले आहेत. ४० वर्षांचा मंगेश हा साकिनाका येथील रमेश सुदन चाळीत पत्नी मधुरा, तीन मुली (अज्ञना (१), आरोही (१), हर्षिता (४)) आणि मुलगा अमेय यांच्यासोबत राहायचा. घटनेच्या दिवशी त्याने पत्नी आणि मुलाला मित्राकडे पैशांची व्यवस्था करण्यास पाठविले होते. मुळात ‘मुलगा आणि पत्नीची हत्या करण्याचे धाडस आपल्यात नव्हते,’ म्हणून त्यांना पैशांची व्यवस्था करण्याचे कारण पुढे करत बाहेर धाडल्याचेही त्याने सुसाइड नोटमध्ये म्हटले आहे.पोलिसांनी घटनास्थळावरून दूध, चहा, टोस्टचे नमुने ताब्यात घेतले आहेत. खाण्यातून मुलींना विष दिल्याचा संशय पोलिसांना आहे. शेजाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जेव्हा घटना समोर आली, तेव्हा तिन्ही मुलींचे तोंड पांढऱ्या कपड्याने बांधलेले होते. मुलींच्या ओरडण्याचा आवाज बाहेर जाऊ नये, म्हणून त्याने तोंड बांधले असावे, असा अंदाज पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती साकिनाका पोलिसांनी दिली. (प्रतिनिधी)
वडिलांसह तिघांविरुद्ध गुन्हा; भावाला अटक
By admin | Published: November 14, 2016 5:31 AM