नवी मुंबई : ऐरोलीमधील नेहा अपार्टमेंटमध्ये घर खरेदी करणाऱ्या रहिवाशांची बांधकाम व्यावसायिकाने फसवणूक केली आहे. इमारतीमध्ये पार्किंगच्या जागेवर व्यावसायिक गाळे बांधून विकले असून दहा वर्षे पाठपुरावा करूनही भोगवटा प्रमाणपत्र मिळवून न दिल्याने चार जणांविरोधात मोफा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. भूखंडाच्या मूळ मालक बेबीबाई जोशी असून त्यांना साडेबारा टक्के अंतर्गत हा भूखंड मिळाला आहे. त्यांनी पालिकेकडून १९९८ मध्ये बांधकाम परवानगी घेतली. परंतु त्यांच्या वैयक्तिक अडचणींमुळे तो भूखंड गीता व विष्णू राऊत यांना विकला. या भूखंडावर इमारत बांधकाम करण्याचे अधिकार शहाजी जावीर यांना दिले होते. त्यासाठी मे २०१४ मध्ये करार केला होता. या कराराप्रमाणे इमारतीमधील सदनिका विकण्याचा अधिकारही जावीर यांना दिला होता. जावीर यांना १३ लाख रुपये देवून रमेश गावकर यांनी दुसऱ्या मजल्यावर ९०५ चौरस फुटांची सदनिका खरेदी केली होती. यासाठी नोव्हेंबर २००५ मध्ये करार केला होता. २००७ मध्ये ते राहण्यासाठी आले. परंतु त्यानंतरही विकासकाने या भूखंडाला भोगवटा प्रमाणपत्र मिळवून दिले नाही. याशिवाय पार्किंगच्या जागेवर अनधिकृतपणे दुकानांचे बांधकाम केले आहे. महापालिकेने संबंधितांना नोटीस देवून ते गाळे पाडले आहेत. विकासकाने भोगवटा प्रमाणपत्र मिळवून द्यावे यासाठी गावकर इमारतीमधील रहिवाशांनी वारंवार पाठपुरावा केला आहे. परंतु त्यांनी सहकार्य केले नाही. बांधकाम व्यावसायिकाने महाराष्ट्र मालकीहक्क कायद्याप्रमाणे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर भोगवटा प्रमाणपत्र मिळवून दिले नाही. सोसायटीच्या नोंदणीनंतर चार महिन्यांनंतर अभिहस्तांतरण करून दिले नाही. महापालिकेने मंजूर केलेल्या नकाशाप्रमाणे बांधकाम केले नाही. नागरिकांनी कर्ज घेवून घर खरेदी केले. त्या सर्वांची फसवणूक केल्यामुळे बांधकाम व्यावसायिकांवर मोफाअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. या तक्रारीची दखल घेवून सहायक पोलीस आयुक्त दिलीप माने यांनी रबाळे पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना तपास करून कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. पोलिसांनी चारही जणांविरोधात मोफाअंतर्गत गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे. (प्रतिनिधी)असा मिळाला भूखंड- गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये शहाजी जावीर, गीता अनिल राऊत, विष्णू तुकाराम राऊत व योगेश एन्टरप्रायजेस कंपनीचे मालक यांचा समावेश आहे.- ऐरोली सेक्टर ७ मधील नेहा अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या रमेश गावकर यांनी त्यांच्याविरोधात तक्रार केली आहे. येथील भूखंडाच्या मूळ मालक बेबीबाई जोशी असून त्यांना साडेबारा टक्के अंतर्गत हा भूखंड मिळाला आहे.
मोफा कायद्याअंतर्गत चार बिल्डरविरुद्ध गुन्हा
By admin | Published: July 28, 2016 1:09 AM