लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : बारबाला असा उल्लेख करून पत्नीचा वारंवार अश्लाघ्य भाषेत अवमान करणारा पती आणि कार खरेदी करण्यासाठी माहेरहून पाच लाख रुपये आणण्याचा तगादा लावणारे त्याचे आई-वडील यांच्यावर एमएचबी कॉलनी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस तक्रारीनुसार तक्रारदार महिला सुनीता (नावात बदल) ही दहिसर पश्चिमेच्या कांदरपाडा परिसरात राहते. तिचे वसंत (नावात बदल) या पुण्यात राहणाऱ्या बीजवराशी गेल्यावर्षी मेमध्ये लग्न झाले. लग्नात सुनीताला माहेरच्यांनी जवळपास दोन लाख रुपयांचे दागिने आणि काही महागड्या घरगुती वस्तूही भेट दिल्या.
मात्र लग्नानंतर काही दिवसांनी तिच्या सासूने अत्यंत अश्लाघ्य भाषेत तिचा पाणउतारा करण्यास सुरुवात केली. तिच्या सासऱ्यांनीही तिचा अवमान केला. सासू-सासरे यांच्याबरोबर दीर आणि जाऊबाईही कार घेण्यासाठी माहेरहून पाच लाख रुपये आणण्यासाठी तिचा जाच करू लागले. पती आपल्याला पुण्यातील बुधवार पेठ या रेड लाईट एरियात घेऊन गेला आणि तेथे शरीर विक्रय करणाऱ्या महिलांशी माझी तुलना केली, असे सुनीताने तक्रारीत म्हटले आहे.
वसंत तिला शिवीगाळ आणि मारहाण करत असल्याने गेल्यावर्षी तिच्या आई-वडिलांनी सासरच्या मंडळींना समजावण्याचा प्रयत्न केला. वसंत सतत अवमानकारक शेरेबाजी करीत होताच परंतु त्याचे विवाहबाह्य संबंधही आहेत, असा आरोप सुनीताने तक्रारीत केला आहे. आपल्या आई-वडिलांनी लग्नात अधिक खर्च करावा, अशी सासरच्यांची अपेक्षा होती, मात्र माझ्या आई-वडिलांनी त्यांच्या अपेक्षेएवढा खर्च केला नाही, तसेच मी वसंतच्या विवाहबाह्य संबंधांबाबत जाब विचारल्याने आपल्याला त्रास दिला जात असल्याचेही सुनीताने पोलिस तक्रारीत नमूद केले आहे.