मनीषा म्हात्रे
मुंबई : मानखुर्द चिल्ड्रन्स होम शेजारील शासनाच्या भूखंडावरील अनधिकृत बांधकामाविरुद्ध ‘लोकमत’ने वाचा फोडताच महिला व बालविकास अधिकारी, पोलिसांनी अतिक्रमणाची पाहणी केली. याप्रकरणी बालगृह कर्मचाऱ्याच्या तक्रार अर्जाची दखल घेत भूमाफिया किशोर रामजी टांकसह आठ ते दहा जणांविरुद्ध गोवंडी पोलिसांत शनिवारी रात्री गुन्हा नोंदवत चौकशी सुरू केली आहे.
बालगृहातील मुलांच्या भवितव्यासाठी शासन नियंत्रित दी चिल्ड्रेन्स एड् सोसायटी या संस्थेच्या ताब्यात महसूल विभागाकडून प्राप्त मानखुर्द विभागात व मुंबई उपनगर जिल्हाधिकारी यांच्या अधिकार क्षेत्रात येणारी साधारणपणे पंचावन्न एकर जागा आहे. १९९० पासून शासनाच्या जवळपास १७ ते २३ एकरहून अधिक जागेवर हे अतिक्रमण डोके वर काढत आहे. प्रशासन दखल घेत नसल्याने बालगृह अधिकाऱ्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत होते.
‘लोकमत’च्या दणक्यानंतर...
‘लोकमत’ने याविषयी वाचा फोडताच अखेर महिला व बालविकास अधिकारी, पोलिस उपायुक्तांनी तसेच संबंधित यंत्रणांनी मानखुर्द चिल्ड्रन्स होमकडे धाव घेतली. दी चिल्ड्रेन्स एड् सोसायटीचे प्रभारी मिळकत व्यवस्थापक रवींद्र पवार यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. पवार यांच्या तक्रारीनुसार, मानखुर्द चिल्ड्रन्स होमभोवती १९८८ साली संरक्षणासाठी तारेचे कुंपण केले. मार्चमध्ये नेहमीप्रमाणे भेटीदरम्यान किशोर टांक आणि त्याच्या ८ ते १० जणांनी शासकीय विशेष मुलींचे पुनर्वसनगृह, नवजीवन शासकीय महिलांचे पुनर्वसनगृह व टेलिकॉम फॅक्टरी, देवनार शेजारी लागून असणाऱ्या बालकल्याण नगरी या संस्थेतील मुलींच्या निवासी इमारतीच्या समोरील तारेचे कुंपण तोडून व बांधकाम केल्याचे दिसून आले. पत्र्याच्या बांधकामातून शौचालयाच्या पाइपलाइन्स निवासी परिसरात सोडून देत मुलींच्या आरोग्याचा तसेच सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला. तसेच, निवासी इमारतीच्या शेजारी असलेल्या कार्यशाळेला असलेले तारेचे कुंपण तोडून कार्यशाळेला तसेच दरवाजे, खिडक्या तोडून नुकसान केले. बेकायदा कच्चे पक्के बांधकाम केल्याची तक्रार दिली. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारी घेत कारवाई करणे गरजेचे असल्याचे बालगृह कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.
अतिक्रमणाबाबत महिला व बालविकास अधिकारी आणि पोलिसांनी मानखुर्द चिल्ड्रन्स होम येथील परिसराची पाहणी केली. याप्रकरणी बालगृह अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून अज्ञात भूमाफियांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. याप्रकरणी अधिक चौकशी करत योग्य ती कारवाई केली जाईल. - सुदर्शन होनवडजकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, गोवंडी पोलिस ठाणे
पोलिसांनाही न्यायालयाचा धाकपोलिसांनी कारवाई केली तर त्यांच्या विरोधात भूमाफियाकडून उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येत आहे. आतापर्यंत तीन याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. पोलिसांवर दबाव आणण्यासाठी भूमाफिया असा मार्ग अवलंबत असल्याचेही एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.