लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : सांताक्रूझ पोलिसांनी भारत रिॲलिटी व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड या बांधकाम समूहाविरोधात हवेच्या गुणवत्तेतील घसरणीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी सोमवारी रात्री मुंबईतील पहिला गुन्हा दाखल केला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न केल्याबद्दल हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.
संबंधित बिल्डरने वायू प्रदूषण रोखण्यासंदर्भात उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले नाही. सांताक्रूझ पोलिसांनी सोमवारी भारतीय दंड संहिता कलम २९१ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ नोव्हेंबरला मुंबई उच्च न्यायालयाने प्रदूषणाप्रकरणी महापालिकेला दोषींवर कारवाई करण्याचे आदेश दिले. बांधकामाच्या ठिकाणी योग्य आणि पुरेशा उपाययोजना न केल्याने धुळीच्या कणांमुळे लोकांना त्रास होत असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले होते.
भारत रिॲलिटी व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने विलेपार्ले (पश्चिम) येथील बांधकामाच्या ठिकाणी धुळीच्या कणांमुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी २५ फूट उंच पत्रे उभारले नाहीत. त्यामुळे पालिकेने संबंधित बिल्डरला नोटीस बजावली हाेती.
धूळ राेखण्यात बिल्डर ठरला अपयशीnतक्रारीनुसार, आरोपीने २५ फुटांचे पत्रे न लावता पुन्हा बांधकाम सुरू केले आणि आदेशाचे उल्लंघन केले. त्यानुसार पालिकेच्या अधिकाऱ्यांनी बिल्डरविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल केला, अशी माहिती पोलिसांनी दिली. nपालिकेच्या पर्यावरण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, धूळ कमी करण्याच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल आतापर्यंत ३४३ ‘स्टॉप वर्क्र’ नोटिसा बांधकाम कंपन्या आणि बिल्डरांना देण्यात आल्या आहेत. nवॉर्ड स्तरावरील अधिकाऱ्यांना नियमित तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत. नियमांचे उल्लंघन झाल्यास पोलिस तक्रार केली जाईल.