मुंबई : कार्यालयातील सहकारी महिलेला विवाह करण्याचे वचन देत शितपेयातून गुंगीचे औषध पाजून तिच्यावर बलात्कार केल्याच्या आरोपावरून व्ही.पी. रोड पोलिसांनी सुनील मिश्रा या पवईतील बहुराष्ट्रीय कंपनीतील अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे. बलात्काराचे मोबाइल फोनवर चित्रण करून ते नेटवर व्हायरल करण्याची धमकी देत त्याने पोलिसात तक्रार न करण्याचे बजावले होते, असे पीडित महिलेने तक्रारीत म्हटले आहे. पुणे येथे होणाऱ्या कॉन्फरन्सच्या निमित्ताने आरोपी सुनील मिश्राने आपल्याला सोबत नेले. तेथे हॉटेलमधील रूममध्ये आपल्याशी विवाह करण्याची इच्छा त्याने व्यक्त केली. आपल्या बॅगेतून शितपेयाची बाटली काढून ते आपणास प्यावयास दिले. ते प्यायल्याने आपल्याला गुंगी आली. अर्धवट शुद्धीत असताना त्याने बलात्कार केला असे पीडित महिलेने तक्रारीत म्हटले. महिनाभर चतु:श्रुंगी, पवई आणि व्ही.पी. रोड या तीन पोलीस ठाण्यांमध्ये हेलपाटे मारल्यानंतरही पोलिसांनी एफआयआर दाखल केला नाही. मात्र राष्ट्रीय भ्रष्टाचार आणि अपराध निवारक परिषदेचे अध्यक्ष मोहन कृष्णन यांनी याबाबत अतिरिक्त पोलीस आयुक्तांना निवेदन सादर केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. (प्रतिनिधी)
बलात्कार प्रकरणी अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा
By admin | Published: October 13, 2016 4:28 AM