मुंबई : आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाने गुरुवारी पुकारलेल्या बंददरम्यान राज्यभरात ठिकठिकाणी हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक आणि तोडफोडीच्या घटना घडल्या. या प्रकरणांमध्ये शुक्रवारी पुणे, औरंगाबाद, नागपूर, आदी ठिकाणच्या हजारो आंदोलकांवर गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. तसेच शेकडो कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली आहे.पुण्याच्या वेगवेगळ्या भागात तोडफोड तसेच पोलिसांवर दगडफेक करणाºया १५५ जणांना पोलिसांकडून अटक करण्यात आली. या दगडफेकीत पाच पोलीस जखमी झाले होते. त्यापैकी एका पोलिसाला गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी बंडगार्डन, सिंहगड, येरवडा, कोथरूड, येरवडा पोलीस ठाण्यात एकूण अठरा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.तसेच बंददरम्यान नागपूर रेल्वे रुळावर झोपून आंदोलन करणाºया पाच, तसेच ट्रॅव्हल्स बसची तोडफोड करणाºया दोन अशा एकूण सात जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. रेल्वेवरील आंदोलनप्रकरणी महेश माने, दीपक इंगळे, तेजसिंह शिर्के, प्रशांत मोहिते, मनोज जाधव या आंदोलकांना मानकापूर पोलीस पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांची रवानगी खुल्या कारागृहात करण्यात आली आहे.
>मराठवाड्यात पाच हजार जणांवर गुन्हेमराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत सुमारे पाच हजार आंदोलकांवर गुन्हे नोंदविण्यात आले असून एकूण ३६ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. औरंगाबादेतील वाळूज एमआयडीसीतील तोडफोड आणि जाळपोळप्रकरणी एमआयडीसी वाळूज ठाण्यात पाच गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. याप्रकरणी३० संशयितांना ताब्यात घेण्यात आले. रेल्वे रोखल्याप्रकरणी सुमारे ४ हजार आंदोलकांवर लोहमार्ग पोलिसांनी गुन्हे नोंदविले आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यात जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाच, तर भूम शहरात बसवर दगडफेकप्रकरणी ३० जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नांदेड जिल्ह्यात सात पोलीस ठाण्यांत ३०० हून अधिक जणांवर गुन्हे नोंदविले आहेत, तर जालन्यात २२ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सेनगाव (जि. हिंगोली) शहरात जाळपोळ केल्याप्रकरणी ११ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आहेत. तसेच तोष्णीवाल महाविद्यालयाची स्कूल बस जाळल्याच्या प्रकरणात अज्ञात चार ते पाच जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.