वेणुगोपाळ धूत यांच्याविरुद्ध गुन्हा; बँकांच्या फसवणुकीचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2020 04:38 AM2020-06-24T04:38:44+5:302020-06-24T04:39:03+5:30
बँकांच्या समुहाचे अप्रामाणिक वर्तनाने नुकसान केल्याबद्दल सीबीआयने व्हिडिओकॉन कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक वेणुगोपाळ धूत यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.
मुंबई : स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखालील बँकांच्या समुहाचे अप्रामाणिक वर्तनाने नुकसान केल्याबद्दल सीबीआयने व्हिडिओकॉन कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक वेणुगोपाळ धूत यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. त्यांना लवकरच जबाबांसाठी बोलावले जाईल, असे सीबीआयमधील सूत्रांनी सांगितले.
व्हिडिओकॉन इन्डस्ट्रिज कंपनीने आफ्रिकेत मोझाम्बिक या देशात तेल व नैसर्गिक वायू उद्योग खरेदी करताना गैरव्यवहार केले, असे सीबीआयचे म्हणणे आहे. तारण म्हणून ठेवलेली ही संपत्ती नंतर स्टेट बँकेसह अन्य धनको बँकांनी ताब्यात घेतली होती. ‘सीबीआय’च्या म्हणण्यानुसार धूत यांचे स्टँडर्ड चार्टर्ड बँकेस ६५० दशलक्ष डॉलरचे देणे होते. परंतु त्याऐवजी ही मालमत्ता विकून स्टेट बँक, आयडीबीआय व आयसीआयसीआय या बँकांनी स्टँडर्ड चार्टर्ड बँकेस त्याहून जास्त म्हणजे ७०५.४५ दशलक्ष डॉलर एवढी रक्कम दिली. बँकांनी ही रक्कम फेब्रुवारी २०१३ मध्ये दिली होती.