अडचणीत वाढ, मुलुंड पोलिसांची कारवाई
अडचणीत वाढ, मुलुंड पोलिसांची कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांना शिविगाळ करणाऱ्या दुकानदार जतीन प्रेमजी सतराच्या (३५) अडचणीत वाढ झाली आहे. गुरुवारी रात्री उशिराने त्याच्याविरुद्ध ॲट्रॉसिटीअंतर्गत दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुरुवारी सकाळी मुलुंड वाहतूक विभागाचे पोलीस शिपाई ज्ञानेश्वर वाघ आणि गोरख सानप हे आरआरटी रोड येथे नो पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या गाड्यांवर कारवाई करीत होते. त्याच दरम्यान दुकानासमोरील रस्त्यावर पार्क केलेल्या जतीनच्या दुुचाकीचा फोटो काढत वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. याच रागात जतीनने पोलिसांना अश्लील भाषेत शिविगाळ सुरु केली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. याप्रकरणी वाघ यांच्या तक्रारीवरून मुलुंड पोलिसांनी जतीनविरुद्ध सरकारी कामात अडथळा निर्माण करणे तसेच शिविगाळ केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवत जतीनला अटक केली.
त्यापाठोपाठ विनोदकुमार बाबुलाल कजानिया (५०) यांच्या तक्रारीवरून जतीन विरुद्ध रात्री उशिराने दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कजानिया यांच्या तक्रारीत, सतरा याने वाहतूक पोलिसांसोबत हुज्जत घालताना फिर्यादी यांच्या समाजाबद्दल सार्वजनिक ठिकाणी अपशब्द उच्चारून त्यांच्या भावना दुखावल्या. तसेच त्यांच्या समाजाचा व जातीचा अपमान केल्याचे नमूद केले आहे.
त्यानुसार, जातीवरून अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती मुलुंड पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयालक्ष्मी हिरेमठ यांनी दिली.
....
कारवाईनंतर माफीचा व्हिडिओ व्हायरल
जतीनविरुद्ध अटकेची कारवाई केल्यानंतर त्याने मुंबई पोलिसांची माफी मागत मुंबई पोलिसांच्या कामाला सलाम केला. याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे.