बारावी पास बनला डॉक्टर; गोवंडीत पाच ते सहा वर्षांपासून रुग्णांच्या जिवाशी खेळ, गुन्हे शाखेची कारवाई
By मनीषा म्हात्रे | Published: November 19, 2023 03:58 PM2023-11-19T15:58:55+5:302023-11-19T16:00:08+5:30
गुन्हे शाखेने बोगस रुग्ण पाठवून खानच्या दवाखान्यात छापा टाकला.
मनीषा म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : बारावी पास असताना गोवंडीत दवाखाना थाटून रुग्णांवर उपचार करणाऱ्या बोगस डॉकटरला गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहे. अल्ताफ हुसेन मोहमद निजाम खान ( ५०) असे अटक करण्यात आरोपीचे नाव असून गेल्या पाच ते सहा वर्षांपासून तो रुग्णावर उपचार करत होता.
गुन्हे शाखेच्या कक्ष ६ चे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने कारवाई केली आहे. गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर, गोवंडी परिसरात, वैद्यकीय क्षेत्रातील कोणत्याही शाखेची पदवी, शिक्षण न घेता काही जण वैदयकीय उपचार करून त्यांचे आरोग्य धोक्यात टाकत असल्याची माहिती मिळाली. त्याच,माहितीच्या आधारे पालिकेच्या स्थानिक सहाय्यक वैद्यकिय अधिकाऱ्यांच्या मदतीने गुन्हे शाखेने बोगस रुग्ण पाठवून खानच्या दवाखान्यात छापा टाकला.
त्याच्याकडे कोणताही अधिकृत वैद्यकिय परवाना नसताना तसेच महाराष्ट्र मेडीकल कौन्सिल मध्ये नोंदणी नसताना डॉक्टर असल्याचे भासवून बेकायदेशिररित्या विविध आजारावरील रुग्णांवर औषधेपचार करताना मिळून आला. त्याच्या ताब्यातुन स्टेथेस्कोप, वेगवेगळया प्रकारचे इंजेक्शन बॉटल्स, सिरींज, अॅन्टीबायोटिक टॅबलेट्स असे वेगवंगळया प्रकारचे औषधे व वैद्यकिय साहित्य जप्त करण्यात आले. तो बारावी पास असून गेल्या पाच ते सहा वर्षांपासून हा दवाखाना चालवत होता. प्रत्येक रुग्णामागे दोनशे रुपये आकारत होता. त्याच्या विरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी खानला अटक करत अधिक तपास सुरू आहे.