क्राईम ब्रँचमधील दोघे लाचखोर पोलीस गजाआड
By admin | Published: July 27, 2016 12:41 AM2016-07-27T00:41:22+5:302016-07-27T00:41:22+5:30
न्यायालयाने निर्दोष ठरविलेल्या निकालाविरुद्ध वरच्या कोर्टात अपिल न करण्यासाठी २० हजारांची लाच घेताना गुन्हा अन्वेषण शाखेच्या दोघा पोलिसांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने
मुंबई: न्यायालयाने निर्दोष ठरविलेल्या निकालाविरुद्ध वरच्या कोर्टात अपिल न करण्यासाठी २० हजारांची लाच घेताना गुन्हा अन्वेषण शाखेच्या दोघा पोलिसांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी रंगेहाथ पकडले. हवालदार जितेंद्र शांताराम डावरे (वय ४६) व नाईक महादेव पांडुरंग राणे (४५) अशी त्यांची नावे आहेत.
आझाद मैदान पोलीस कॅन्टीनमध्ये फिर्यादीकडून प्रत्येकी १० हजार रुपये घेत असताना त्यांना अटक करण्यात आली. या कारवाईमुळे पोलीस ठाण्याच्या परिसरात काहीकाळ घबराट निर्माण झाली.
क्राईम ब्रँचच्या कक्ष-१ने एका गुन्ह्यात तरुणाला अटक करुन कोर्टात आरोपपत्र दाखल केले होते. मात्र सबळ पुराव्याअभावी त्याची निर्दोष मुक्तता झाली. त्यावर कोर्ट कारकून असलेल्या हवालदार जितेंद्र डावरे व नाईक महादेव राणे यांनी वरिष्ठ न्यायालयात अपिल करणार आहोत, ते टाळायचे असल्यास दोघांना प्रत्येकी १० हजार रुपये देण्याची मागणी केली. फिर्यादीने त्याबाबत एसीबीकडे तक्रार दिली. सोमवारी पथकाने खातरजमा केली असता तथ्य आढळून आल्याने आझाद मैदान पोलीस कॅन्टीन येथे सापळा रचण्यात आला. दुपारी दोनच्या सुमारास फिर्यादीकडून पैसे घेतल्यानंतर डावरे व राणे यांना पकडण्यात आले. (प्रतिनिधी)