पालिका अभियंत्याकडे गुन्हे शाखेची चौकशी, घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2024 07:55 AM2024-06-04T07:55:31+5:302024-06-04T07:55:47+5:30
होर्डिंगबाबत भिंडेविरुद्ध महापालिकेत तक्रार येताच, महापालिकेने भिंडेला नोटीस पाठवली.
मुंबई : मुंबई महापालिकेच्या एन वॉर्डमधील तत्कालीन अभियंता सुनील दळवी याची सोमवारी गुन्हे शाखेकडून कसून चौकशी करण्यात आली. अनधिकृत होर्डिंग उभारल्याबाबत, दळवी याने मुंबई रेल्वे पोलिसांना नोटीस दिली होती. त्यानंतर, पुन्हा नोटीस मागे का घेतली? कारवाई का केली नाही? याबाबत चौकशी सुरू आहे. तो भावेश भिंडेच्या सतत संपर्कात होता.
होर्डिंगबाबत भिंडेविरुद्ध महापालिकेत तक्रार येताच, महापालिकेने भिंडेला नोटीस पाठवली. त्याने, रेल्वे पोलिसांच्या परवानगीबाबत सांगताच महापालिकेने अनधिकृत होर्डिंगबाबत रेल्वे पोलिसांना नोटीस बजावत पालिका परवानगीबाबत विचारणा केली. तेव्हा, पोलिसांकडून रेल्वे प्रशासनाच्या मालमत्तेवर उभारलेल्या फलकावर पालिकेला उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई करता येत नसल्याचे १९ एप्रिल २०२२ मध्ये पत्र पाठवले.
अनधिकृत होर्डिंग उभारल्याबाबत दळवीनेच मुंबई रेल्वे पोलिसांना नोटीस दिली. त्यानंतर, पुन्हा नोटीस मागे घेतली. त्यानुसार, त्याच्याकडे चौकशी सुरू आहे. पैशांच्या व्यवहारानंतर नोटीस मागे घेतल्याचा संशय असून, गुन्हे शाखा कसून चौकशी करीत आहे. १३ मेला होर्डिंग कोसळण्याच्या आधी दळवी याची एप्रिल २०२४ मध्ये बदली झाली आहे. तसेच, दळवी याच्या बँक खात्याचा लेखाजोखादेखील तपासण्यात येत आहे.
भिंडे कुटुंबाला दोन कोटी
होर्डिंग प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या भावेश भिंडे याच्या कुटुंबाला ईगो मीडियातून दोन कोटी मिळाल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत गुन्हे शाखा अधिक तपास करीत आहे.