मुंबई: विक्रोळीत विक्रीसाठी आणलेला तब्बल एक कोटी ६ लाखांचा गुटखा जप्त करण्यात गुन्हे शाखेच्या कक्ष नऊला यश आले आहे. गुन्हे शाखेने याप्रकरणात इब्राहिम मैनुद्दीन इनामदार (३०), संतोषकुमार रामसिंहासन सिंग (२५) आणि कलीम वाहिद हसन खान (३०) या त्रिकुटाला बेड्या ठोकल्या आहेत.
राज्यात प्रतिबंधीत असलेल्या गुटख्याची अवैधरित्या विक्री केली जात असल्याची माहिती कक्ष नऊचे प्रभारी पोलीस निरिक्षक दया नायक यांना मिळताच, त्यांच्या नेतृत्वात कक्ष नऊच्या पथकाने सोमवारी सापळा रचला. डी. एन. नगर परिसरातून गुटख्याची अवैध वाहतूक करत असलेला एक ट्रक ताब्यात घेतला. या कारवाईत गुन्हे शाखेने ७८ लाख एक हजार २०० रुपये किंमतीचा गुटखा आणि २६ लाख रुपये किंमतीचा ट्रक जप्त केला.
कक्ष नऊने याप्रकरणी डी. एन. नगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवत, आरोपी इनामदार याला अटक केली पुढील तपासासाठी हा गुन्हा पोलिसांकडे वर्ग करण्यात आली आहे. इनामदारच्या चौकशीत गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी कांदिवली येथे पार्क केलेला गुटख्याने भरलेला एक टेम्पो ताब्यात घेतला. या कारवाईत गुन्हे शाखेने सिंग आणि खान यांना अटक करुन २८ लाख १७ हजार ६०० रुपये किंमतीचा गुटखा आणि ताब्यात घेतलेला सात लाख रुपये किंमतीचा टेम्पो जप्त केला.
गुन्ह्यातील त्रिकूटाकडून एकूण एक कोटी सहा लाख १८ हजार ८०० रुपये किंमतीचा गुटखा आणि गुन्ह्यात वापरलेली ३३ लाख रुपये किंमतीची दोन वाहने असा एकूण १ कोटी ३९ लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे.