Join us

क्राइम ब्रांचच्या ‘त्या’ स्मिता पाटील, डीसीपी स्वामीला पोलिस शोधताहेत!

By गौरी टेंबकर | Published: August 19, 2023 1:09 PM

मनी लॉन्ड्रिंगमध्ये संशयित बनवत लाखो उकळले

गौरी टेंबकर – कलगुटकर, लोकमत न्यूज नेटवर्क,  मुंबई: मी क्राइम ब्रँचमधून स्मिता पाटील बोलतेय, तुम्ही मनी लॉन्ड्रिंग केसमध्ये संशयित आहात, आमचे डीसीपी स्वामी सर यात व्हेरिफिकेशन करतील असे सांगत एका खासगी कंपनीच्या ३२ वर्षीय महिला टेक्निकल कन्सल्टंटकडून लाखो रुपये उकळण्यात आले. या प्रकरणात परिमंडळ १२ च्या खऱ्या पोलिस उपायुक्त स्मिता पाटील यांच्या फोटोचा गैरवापर करून ओळखपत्र बनवत हा प्रकार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून वाकोला पोलिस तपास करत आहेत.

तक्रारदार सुमन (नावात बदल) ने दिलेल्या तक्रारीनुसार, ७ ऑगस्ट रोजी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास त्यांना ९७६९६४३२६९ या क्रमांकावरून फोन येत मुंबईतून तैवानला पाठविलेल्या पार्सलमध्ये बेकायदा वस्तू मिळाल्याने कस्टमने ते अडविल्याचे सांगितले. ते पार्सल बुक केले नसल्याचे सुमनने सांगितल्यावर स्वतःला अंधेरी सायबर क्राईम सेल अधिकारी म्हणविणाऱ्या स्मिता पाटील नावाच्या महिलेने सुमनचे आधार कार्ड आणि मोबाइल नंबर घेऊन एका मनी लॉन्ड्रिंगच्या केसमध्ये तुम्ही आणि तुमचे बँक खाते संशयित आहात असे सांगितले.

घाबरलेल्या सुमनने मी त्याचा इन्कार केला. त्यावर आरबीआयकडून एक व्हेरिफिकेशन प्रोसेससाठी स्काइप ॲपवरून फोन येईल आणि त्यासाठी नार्कोटेक्स डिव्हिजन अंधेरी पूर्व हे सर्च करत हाय टाइप करायला सांगितले गेले. सुमनने ते केल्यावर पाटीलने ती पोलिस असल्याचे ओळखपत्र पाठवत तिची खासगी माहिती घेत त्याचे व्हेरिफिकेशन डीसीपी स्वामी सर करतील असे सांगितले.

पुढे स्वामी नावाच्या व्यक्तीने फोन घेऊन खाते चेक करायला तुम्हाला ९८ हजार ८८८ रुपये रक्कम गुगल पे करावे लागतील असे सांगून ते अर्ध्या तासात परत मिळेल असेही म्हटले. सुमनने ही रक्कम पाठविल्यावर तुमचा यूपीआय आम्ही तपासलाय. त्यात काही प्रॉब्लेम नाही म्हणत बँकेतून अजून ९८ हजार ८८८ रुपये पाठविण्यास सांगितले. ते पैसेही सुमन यांनी पाठविले.अखेर पुन्हा खाते तपासण्यासाठी एनसीआरबी नावाने बँक खात्यात ४ लाख ४ हजार ६०० रुपये पाठविण्यास सांगण्यात आले आणि ते सुमनने पाठवल्यावर समोरच्या व्यक्तीने कॉल कट केला. सुमनने पुन्हा त्या व्यक्तीला संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण तो लागला नाही. अखेर ६ लाख ६ हजार ३७६ रुपयांच्या फसवणूक प्रकरणी तिने पोलिसात धाव घेतली.

अनेकांना लक्ष्य केल्याचा संशय!

पाटील यांच्याप्रमाणे  स्वामी हे परिमंडळ १२ मध्ये होते. त्यानुसार आरोपींनी या खऱ्या पोलिसांच्या नावाचा वापर करत अनेकांना लक्ष्य केल्याचाही संशय व्यक्त होत आहे.

 

टॅग्स :धोकेबाजीगुन्हेगारी