Join us

रझिया गँगच्या दोन आरोपींना अटक करण्यात, गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाला यश

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2023 8:52 PM

दिल्लीतील सराईत रझिया गँगच्या दोन आरोपींना पकडण्यात गुन्हे शाखा युनिट दोनच्या टीमला यश मिळाले आहे.

नालासोपारा (मंगेश कराळे) :- दिल्लीतील सराईत रझिया गँगच्या दोन आरोपींना पकडण्यात गुन्हे शाखा युनिट दोनच्या टीमला यश मिळाले आहे. दोन्ही आरोपी खाजगी बसने राजस्थानवरून दिल्लीला पळून जात असताना फालना येथे पोलिसांनी ताब्यात घेतले. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सहा गुन्ह्यांची उकल करून दोन्ही आरोपींना तपास व चौकशीसाठी माणिकपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

वसईच्या अंबाडी क्रॉस पंचवटी हॉटेल जवळील दिवान मेन्शनमध्ये राहणाऱ्या ज्योती जाधव (४३) यांच्या घरी २१ फेब्रुवारीला रात्री साडे अकराच्या सुमारास घराचा बंद दरवाजा उघडून चोरट्यांनी आत प्रवेश करत रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा २ लाख १३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता. माणिकपूर पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास करताना गुन्हे शाखेचे युनिट दोनच्या पोलिसांनी घटनास्थळावरून सीसीटीव्ही फुटेज प्राप्त केले. दोन्ही आरोपी हे हद्दीत तीन दिवस एका लाॅजवर थांबल्याचे निष्पन्न झाल्यावर त्या ठिकाणाहून सीसीटीव्ही, कागदपत्रे, मोबाईल नंबर मिळवून तपास सुरू केला.

आरोपींची माहिती मिळाल्यावर अहमदाबाद या ठिकाणी गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास कांबळे यांना पथकासह रवाना केले. आरोपी हे अहमदाबादवरुन जयपूर येथे खाजगी बसने प्रवास करत असल्याची माहिती प्राप्त झाल्याने त्यांना फालना राजस्थान येथून ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपी अरमान शोकीन खान (३१) आणि रवी मुन्नालाल जोलानिया (३२) या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.  आरोपी आरमान खान याच्यावर मुंबई व आजूबाजूच्या परिसरात २५ पेक्षा अधिक गुन्हे दाखल असल्याचे सूत्रांकडून कळते. 

दिल्लीची प्रसिद्ध रझिया गँग 

घरफोडी करण्यासाठी प्रसिद्ध अशी दिल्लीत एकेकाळी ही गँग कार्यरत होती. रझिया सुलतान सैफी ही गँग चालवत होती. पण तिचा २०१२ मध्ये मृत्यू झाल्यानंतर तिची बहीण शबनम शेख हिने आपल्याकडे या गँगची सूत्रे घेतली. या गँगवर आतापर्यंत सव्वाशे पेक्षा अधिक घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. या गँगचे सदस्य मुंबई व आजूबाजूच्या परिसरातील घरांचे सर्वेक्षण करून त्याठिकानाहून येऊन या ठिकाणी घरफोडी करतात. दोन्ही आरोपींना खाजगी बसमधून ताब्यात घेतले आहे. आरोपीकडून मोबाईल, घड्याळे, रोख रक्कम असा मुद्देमाल हस्तगत केला आहे. दोन्ही आरोपींना वसई न्यायालयाने दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

 

टॅग्स :मुंबईपोलिसगुन्हेगारी