नगरसेवकाचे नाक फोडल्याप्रकरणी गुन्हा, किरकोळ कारणावरुन वाद
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2021 12:01 AM2021-12-29T00:01:28+5:302021-12-29T00:02:05+5:30
स्थानिक सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी भाटेबंदर कडे जाणाऱ्या मार्गावरील पेट्रोल पंप समोर एक तीनचाकी रिक्षा टॅम्पोने तेथील नाताळ निमित्त केलेली रोषणाईचे तोरण तोडले
मीरारोड - भाईंदरच्या उत्तन येथे नाताळ सणानिमित्त केलेली रोषणाई एका टेम्पो चालकाच्या निष्काळजीपणामुळे तुटल्याचा वाद वाढून झालेल्या राड्यात मीरारोडच्या नया नगरचे नगरसेवक अमजद शेख यांच्या नाकावर ठोसा मारून त्यांना जखमी केल्याप्रकरणी पोलिसांनी दोघा मच्छीमारांवर गुन्हा दाखल केला आहे.
स्थानिक सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी भाटेबंदर कडे जाणाऱ्या मार्गावरील पेट्रोल पंप समोर एक तीनचाकी रिक्षा टॅम्पोने तेथील नाताळ निमित्त केलेली रोषणाईचे तोरण तोडले. त्यावरून टॅम्पो चालकने नुकसान भरपाई देतो सांगून देखील मच्छीमार तरुणांनी वाद घातला. त्यावेळी चालकाचा भाऊ दुचाकी वरून आला.
बोलाचालीत दुचाकीवरील लहान मुलगा खाली पडल्याने टॅम्पो चालकाने एकाच्या डोक्यात वीट मारली. जेणे करून वाद पुन्हा भडकला. कोळिणींसह मच्छीमार जमले व वाद मिटवण्याचा प्रयत्न होत असतानाच नगरसेवक अमजद शेख हे त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांसह तेथे धावून आले. बोलाचालीमध्ये नगरसेवकाच्या नाकावर मच्छीमाराने ठोसा मारला. जेणे करून त्यांच्या नाकातून भळाभळा रक्त वाहू लागले. त्यांना नजीकच्या खाजगी रुग्णालयात नेले व त्यानं नंतर भाईंदर येथील भीमसेन जोशी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अमजद यांच्या नाकाचे हाड तुटले असून त्यांच्या फिर्यादी नंतर मंगळवारी उत्तन सागरी पोलीस ठाण्यात ॲग्नीलो गडई व लिनस सांब-या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.