मुंबई : हवालाच्या माध्यमातून पैसे उकळत स्वत:चे उखळ पांढरे करण्याच्या कस्टम अधिकाऱ्यांच्या रॅकेटचा केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) पर्दाफाश केला आहे. जी-पेच्या माध्यमातून लाचखोरी केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या आलोककुमार या कस्टम अधिकाऱ्याच्या चौकशीतून हवाला रॅकेटच्या सुरस कथा उघडकीस आल्या आहेत. कस्टम क्लिअरिंग एजंटचे काम करून दिल्यानंतर मिळणारे पैसे हवालाच्या माध्यमातून या अधीक्षकांनी आपल्या नातेवाइकांच्या नावे स्वीकारल्याचे निदर्शनास आले आहे.
लाचखोरीच्या प्रकरणात सीबीआयने गेल्या दोन महिन्यांत आलोककुमार, केशव पांधी, हेमंत गेथे, ब्रिजेशकुमार आणि दिनेशकुमार या पाच अधीक्षकांना अटक केली. अन्य एक कस्टम अधीक्षक फरार आहे. यांपैकी आलोककुमार आणि दिनेशकुमार हे मुंबई विमानतळावर कस्टम अधीक्षकपदावर कार्यरत होते. तेथे प्रवाशांकडून त्यांनी जी-पेच्या माध्यमातून लाचखोरी केली. त्या प्रकरणी त्यांना अटक झाली. इतर चौघे अन्यत्र होते. पाचही अधीक्षक २०२० ते २०२२ या कालावधीत न्हावा-शेवात कार्यरत होते.
या बदल्यात त्या एजंटकडून या अधिकाऱ्यांना पैसे मिळत. मात्र हे पैसे या अधिकाऱ्यांनी थेट स्वीकारले नाहीत; तर, हवालाच्या माध्यमातून या अधिकाऱ्यांच्या नातेवाईक किंवा मित्र यांच्या बँक खात्यात ते जमा होत असल्याचे तपासात आढळून आले. पाचही अधिकाऱ्यांनी एका क्लिअरिंग एजंटशी संधान बांधले. या एजंटच्या माध्यमातून क्लिअरिंगसाठी येणाऱ्या मालाची किंमत व पर्यायाने आयात शुल्क कमी दाखवून त्याचा माल बाहेर सोडला जात असे. हवालाद्वारे पैसे फिरवणाऱ्या दोन अन्य व्यक्तींनाही सीबीआयने नुकतीच अटक केली आहे. त्यांच्या मोबाइल तपासणीमध्ये हवालाचे तपशील आढळून आल्याचे समजते.