मुंबई : वाढत्या तिकिटांच्या दरांसोबत रेल्वेने प्रवाशांना तितक्याच सुविधा देणे आवश्यक आहे. मात्र कुर्ला रेल्वे स्थानकात अनेक सुविधांचा अभाव असल्याने प्रवाशांना याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. शिवाय या स्थानकादरम्यान मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीही वाढत असल्याने खुद्द रेल्वे पोलिसांना मोठ्या अडचणींना समोर जावे लागत आहे.मध्य आणि हाबर रेल्वेमार्गावरील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांत कुर्ला स्थानकाचा समावेश होतो. या रेल्वे स्थानकामधून दररोज साडेचार लाख प्रवासी प्रवास करतात. शिवाय याच स्थानकादरम्यान लोकमान्य टिळक टर्मिनस असल्याने या ठिकाणी नेहमी प्रवाशांची मोठी गर्दी असते. रेल्वेला या स्थानकामधून मोठ्या प्रमाणात महसूल मिळत असताना रेल्वेने या स्थानकाकडे नेहमीच दुर्लक्ष केले आहे. या स्थानकाच्या पूर्वेला आणि पश्चिमेला अनेक ठिकाणी संरक्षण भिंत नसल्याने अनेक प्रवासी तसेच स्थानिक नागरिक रेल्वेरूळ ओलांडतात. त्यामुळे या स्थानकादरम्यान महिनाभरात किमान ४ ते ५ लोकांना जीव गमावावा लागतो. आतापर्यंत या स्थानकात हजारो लोकांचे प्राण गेले आहेत, तर अनेकांना अपंगत्वदेखील आले आहे. त्यातच या रेल्वे स्थानकात सायंकाळी आणि सकाळच्या सुमारास प्रवाशांची मोठी गर्दी असते. एकाचवेळी दोन ट्रेन आल्यास मोठी गर्दी वाढते. मात्र या स्थानकावर असलेले पादचारी पूल अगदीच चिंचोळे असल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप होतो. याच गर्दीचा फायदा घेत काही गुन्हेगार महिलांना छेडणे, पाकीटमारी आणि मोबाइल चोरीसारखे गुन्हे करीत असतात. कुर्ला रेल्वे पोलिसांनी स्थानकातील सीसीटीव्ही आणि इतर सुविधांबाबत अनेकदा रेल्वेला पत्र पाठवले आहे. मात्र रेल्वेकडून या पत्रांना नेहमीच केराची टोपली दाखवली जाते. २०१३पासून पोलिसांना अनेक पत्रे पाठवली आहेत, मात्र यातील एकाही समस्येची दखल रेल्वेकडून घेण्यात आलेली नाही. कुर्ला स्थानकासह कुर्ला रेल्वे पोलिसांच्या हद्दीमध्ये लोकमान्य टिळक टर्मिनस, विद्याविहार स्थानक, घाटकोपर, विक्रोळी, कांजूरमार्ग, भांडुप, नाहूर आणि मुलुंड स्थानक आहे. या स्थानकांवरील परिस्थितीदेखील अशीच आहे. (प्रतिनिधी)
कुर्ला स्थानकात गुन्हेगारी वाढली
By admin | Published: September 10, 2014 1:46 AM