नवी मुंबई : चॅरिटीच्या नावाखाली मदत मागण्याच्या बहाण्याने सोसायटीत प्रवेश करून, मोबाइल व लॅपटॉप चोरणाऱ्या तिघांना रबाळे पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून सात गुन्ह्यांची उकल झाली असून, त्यामधील चार लॅपटॉप व २ मोबाइल हस्तगत करण्यात आले आहेत. या टोळीने नवी मुंबईतून चोरलेले मोबाइल व लॅपटॉप कर्नाटकासह तमिळनाडू व गोव्याला विकल्याचे सांगितले आहे.
सकाळच्या वेळी घरातून मोबाइल व लॅपटॉप चोरीला जात असल्याच्या घटना शहरात सातत्याने घडत आहेत. अशा गुन्ह्यांमध्ये सक्रिय टोळ्यांचा उलगडा करण्यासाठी रबाळे पोलिस प्रयत्न करत होते. त्यासाठी वरिष्ठ निरीक्षक दुलबा ढाकणे यांनी निरीक्षक भगुजी औटी, चंद्रकांत लांडगे, सहायक निरीक्षक दीपक खरात, नामदेव मानकुंबरे, शंकर शिंदे, दर्शन कटके व मयूर सोनवणे आदींचे पथक केले होते. या पथकाने सीसीटीव्ही व खबऱ्यांच्या माध्यमातून संशयित टोळीची माहिती मिळविली होती. त्याद्वारे ऐरोली परिसरात पाळत ठेवून तिघा संशयितांना ताब्यात घेतले होते. चौकशीमध्ये एक जण मुका असून, उर्वरित दोघांसह ते चॅरिटी जमा करत असल्याचे सांगण्यात आले. मात्र, पोलिसांना शंका असल्याने सखोल चौकशी करत, त्यांचे कर्नाटकातील मूळ गाव गाठले असता, त्यांचा बनाव उघड होताच, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यानुसार, तिघांनाही अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवराजा डी.टी. तिपेशा उर्फ तिपेशा वडार, अनाप्पा वडार व सुंदरमा वडार अशी त्यांची नावे आहेत.
चोरीची पद्धत अशी सुंदरमा ही इमारतीमध्ये प्रवेश करून दरवाजा उघडा असलेल्या घरांची माहिती द्यायची. त्यानंतर, शिवराजा व अनाप्पा यापैकी एक जण मुक्याचे सोंग घेऊन मदतीच्या बहाण्याने सोसायटीत येऊन दरवाजा उघडा असलेल्या घरात घुसून उघड्यावर ठेवलेले मोबाइल व लॅपटॉप चोरून न्यायचे. अशा प्रकारे त्यांनी रबाळे पोलिस ठाणे हद्दीत केलेले सात गुन्हे उघड झाले असून, त्यामधील चार लॅपटॉप व दोन मोबाइल पोलिसांनी हस्तगत केले.