Join us

धक्कादायक! पत्नीच्या प्रियकराची आधी हत्या केली, नंतर पोलीस ठाणे गाठले

By मनीषा म्हात्रे | Published: August 16, 2023 3:45 PM

वरळीतील घटना.

मुंबई : पत्नीसोबत असलेल्या प्रेमसंबंधाच्या रागात प्रियकराची कोयत्याने वार करत हत्या केल्याची घटना वरळीत मंगळवारी खळबळ उडाली. हत्येनंतर, आरोपीने स्वतः पोलीस ठाण्यात हजर होत हत्येची कबुली दिली आहे. गिरीष जाधव (३७) असे आरोपीचे नाव असून, वरळी पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. 

वरळी बीडीडी चाळ ५ येथे फुटपाथवर मंगळवारी सायंकाळी साडे सहाच्या सुमारास ही घटना घडली. यात जाधव याने बालपणीचा मित्र विनोद साळुंके (३७) याच्या डोक्यात कोयत्याने वार करत हत्या केली. त्यानंतर त्याने वरळी पोलीस ठाणे गाठून हत्येची कबुली दिली. या घटनेने पोलीस ठाण्यात एकच खळबळ उडाली.  

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमी अवस्थेतील साळुंके याला तात्काळ उपचारासाठी केईएम रुग्णालयात नेले. मात्र, तेथे दाखल करण्यापूर्वीच, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनेची नोंद करत, वरळी पोलिसांनी साळुंकेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. त्यानंतर साळुंके याच्या नातेवाईक सागर नितनवरे यांच्या तक्रारीवरुन गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सागर यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीत, साळुंके हा गेल्या तीन वर्षापासून त्यांच्याकडे राहण्यास आला होता. पाठलाग अन् हत्या

जाधव याने पोलिसांना दिलेल्या माहितीत, साळुंके याचे  आपल्या पत्नीसोबत प्रेमसंबंध असल्याचे फेब्रुवारी मध्ये समजताच त्याला धक्का बसला. त्याने या दोघांवर पळत ठेवली. संशय खरा ठरल्यानंतर त्याने मंगळवारी सायंकाळी साळुंके याला बीडीडी चाळीच्या समोरील पुटपाथवर गाठून त्याची हत्या केल्याचे पोलिसांना सांगितले.

टॅग्स :गुन्हेगारीपोलिस