Join us

विमानाचे तिकीट, नातेवाइकाला मेसेज, गळ्यात चावी अन्…; गोरेगावात पती-पत्नीच्या मृत्यूने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2024 4:55 PM

गोरेगावत पती पत्नीच्या मृत्यूच्या प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

Goregaon Crime :मुंबईच्या गोरेगाव परिसरात शुक्रवारी घडलेल्या प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे. गोरेगावमध्ये एका इमारतीखाली संशयास्पद अवस्थेत एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने रहिवाशांना धक्का बसला. त्यापेक्षाही धक्कादायक बाब म्हणजे जेव्हा त्याच्या पत्नीला फोन केला गेला तेव्हा तिनेही आत्महत्या केल्याचे समोर आलं. त्या व्यक्तीची पत्नी फ्लॅटमध्ये मृतावस्थेत पडली होती. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले आणि तपास सुरु केला आहे.

गोरेगावात पत्नीची हत्या करून पतीने इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केल्याचे प्रकरण समोर आलं आहे.  किशोर पेडणेकर आणि राजश्री पेडणेकर असं या मृत दाम्पत्याचं नाव आहे. पत्नीचा मृतदेह खोलीत तर पतीचा मृतदेह इमारतीच्या आवारात सापडल्याने पत्नीची हत्या करून पतीने इमारतीवरून उडी मारल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. किशोर पेडणेकर सेल्समन तर पत्नी राजश्री पेडणेकर या फिजिओथेरपिस्ट होत्या.

प्राथमिक तपासात किशोर पेडणेकर यांनी ओळख पटल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या पत्नी राजश्री पेडणेकर यांना फोन केला, मात्र वारंवार फोन करूनही त्यांनी उत्तर दिलं नाही. आजूबाजूच्या लोकांची चौकशी केल्यानंतर पोलीस पेडणेकर यांच्या फ्लॅटवर पोहोचले. मात्र दरवाजा आतून बंद होता. पोलिसांनी परत खाली येऊन शोध सुरू केला तेव्हा त्यांना किशोर पेडणेकरांच्या गळ्यात दोन चाव्या लटकलेल्या आढळल्या. पोलिसांनी दोन्ही चाव्या काढून त्यांच्यासह फ्लॅटचे कुलूप उघडण्याचा प्रयत्न केला. या चावीने दार उघडले पण आतील दृश्य हादरवणारं होते. राजश्री पेडणेकर यांचा मृतदेहही फ्लॅटमध्ये पडला होता. राजश्रीचा गळा दाबून खून करण्यात आला होता. त्यांच्या गळ्याभोवती कापड होते, असे पोलिसांनी सांगितले.

आत्महत्या करण्यापूर्वी किशोर पेडणेकर यांनी एका नातेवाईकाला मेसेज करून त्यांची बँक खाती, मालमत्तेची माहिती दिली.  मी जिवंत नसेन असंही त्यांनी या मेसेजमध्ये लिहिलं होतं. पेडणेकर यांनी दिल्लीत राहणाऱ्या मुलाला फ्लाईटचं तिकीट पाठवून रात्री ९ पर्यंत मुंबईत येण्यास सांगितलं होतं.

दरम्यान, प्राथमिक तपासात आधी राजश्री यांचा खून झाला असावा आणि नंतर किशोर यांनी आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तपासादरम्यान किशोर पेडणेकर हे तणावात आणि इतर काही आजारांनी त्रस्त होते. डिप्रेशन आणि डायबेटिसची औषधेही घरात सापडली आहेत. डॉ. राजश्री पेडणेकर या मालाड इथल्या एका आरोग्य संस्थेत प्रॅक्टिस करत होत्या, असे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :मुंबईगुन्हेगारीमुंबई पोलीस