Join us  

"क्या हुआ...गुस्से मे पटक दिया होगा", म्हणत पोलिसांनी केली बोळवण, ओलाचालकाला आपटणाऱ्याला घातले पाठीशी?

By मनीषा म्हात्रे | Published: September 01, 2024 9:04 AM

Mumbai Crime News: घाटकोपरमध्ये ऑडी कार चालक ऋषभ चक्रवर्तीने क्रूरपणे केलेल्या मारहाणीत कुटुंबीयांचा आधार असलेला कयमुददीन मैनुददीन कुरेशी (२४) अंथरुणाला खिळला आहे. पोलीस आरोपीला पाठीशी घालत असल्याचा आरोप कुरेशी कुटुंबियांकडून करण्यात येत आहे.

- मनीषा म्हात्रे मुंबई  - घाटकोपरमध्ये ऑडी कार चालक ऋषभ चक्रवर्तीने क्रूरपणे केलेल्या मारहाणीत कुटुंबीयांचा आधार असलेला कयमुददीन मैनुददीन कुरेशी (२४) अंथरुणाला खिळला आहे. पोलीस आरोपीला पाठीशी घालत असल्याचा आरोप कुरेशी कुटुंबियांकडून करण्यात येत आहे. "घटनेनंतर, आधी भावाची तक्रार घेतली नाही. त्यानंतर, आई वडिलांना देखील पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यापेक्षा वाटाघाटी करण्याचा तगादा लावला. एवढेच नाही तर, "क्या हुआ...गुस्से मे पटक दिया होगा""असे बोलून गुन्हा दाखल केल्याची खोटी माहिती देत घरचा रस्ता दाखवल्याचा आरोप कयमुददीनची बहिण शबीना कुरेशीने केला आहे. 

गोवंडी शिवाजी नगर परिसरात कयमुददीन मैनुददीन कुरेशी (२४) हा आई वडील, तीन बहीण, अपंग भाऊ आणि आजोबांसोबत राहतो. कयमुददीनवर संपूर्ण घराची जबाबदारी आहे. शबीनाने दिलेल्या माहितीनुसार, कोलकत्ता प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर डॉक्टरांच्या सुरू असलेल्या संपामुळे कयमुददीनच्या प्रकृतीत सुधारणा नसतानाही त्याला जे जे रुग्णालयातून डिस्चार्ज देण्याची घाई करण्यात आली आहे. तो मध्येच बेशुद्ध पडतोय. त्याच्या कानातून सतत पाणी येते. उपचारासाठी खर्च करायला पैसे नाही. वर्षभर तरी तो काम करू शकत नसल्याचेही एका डॉक्टरने सांगितले. त्याला काही झाले तर आम्ही काय करायचे? असा सवाल तिने उपस्थित केला आहे.

भावाच्या वेदना सहन होत नाही आहे. ऋषभने सैतानासारखे माझ्या भावाला आपटले. पोलिस मात्र आरोपीला पाठीशी घालत आहे. एवढी क्रूर मारहाण केली असताना देखील कमी शिक्षेचे कलम लावून हात वर करण्यात आले. हल्ल्यानंतर कायमुद्दिनने पोलीस ठाणे गाठले. काही मित्रांना पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. पोलिसांनीच त्यालाच उलट प्रश्न करत आधी मेडिकल रिपोर्ट आणायला सांगितला. राजावाडी रुग्णालयात औषधोपचारासाठी गेला असता डोक्यास गंभीर इजा असल्याने तेथील डॉक्टरानी जेजे हॉस्पीटल येथे जाण्यास सांगितले. हल्ल्याबाबत आम्हाला समजताच आम्ही जेजे रुग्णालय गाठल्यानंतर घटनाक्रम समोर आल्याचे शबीनाने सांगितले. आई वडिलांनी दुसऱ्या दिवशी तक्रारीसाठी पोलीस ठाणे गाठले. तेव्हा, तपास अधिकाऱ्याने त्यांनाच दमदाटी करत कयमुददीनने पाठलाग का करायचा? रागात आपटले असेल.. असे सांगितले. गुन्हा दाखल करण्यासाठी तगादा लावताच त्यांनाच पैसे घेवून सेटलमेंट करण्यास सांगितले. त्यानंतर गुन्हा दाखल केल्याचे सांगून त्यांना घरी धाडले. प्रत्यक्षात, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर घटनेच्या दहा दिवसाने २८ तारखेला गुन्हा दाखल केल्याचा आरोपही शबीनाने केला आहे. शनिवारी रात्री त्याची तब्येत बिघडल्याने त्याला पुन्हा जे जे रुग्णालयात नेण्यात आले आहे. 

ओला चालकाचा डीव्हाईज चोरल्यामुळे पाठलाग...ओला चालकाच्या तक्रारीनुसार,  १८ ऑगस्ट रोजी भाडे घेवून सकाळी साडे अकरा वाजता कामासाठी निघालो. रात्री साडे अकरा वाजता साकीनाका  येथून नवी मुंबई उलवेसाठी भाडे घेउन जात असताना असल्फा मेट्रो स्टेशन जवळ रात्री पावणे बाराला चक्रवर्तीची ऑडी उजव्या बाजूने घासली. गाडीच्या उजव्या बाजूला उतरून नुकसान बघत असताना त्याच्या पत्नीने उतरून शिवीगाळ करत पोलीस कारवाईची भिती घातली. गाडीची चावी हिसकावण्याच्या प्रयत्न केला. तेथेही रिषभने मारहाण करत त्याच्या पत्नीने गाडीचा डीव्हाईज काढून घेतला. तेथून दोघेही पळून गेले. प्रवाशांना तेथेच उतरून ओला चालक ओला डीव्हाईज घेण्यासाठी त्याच्या मागे गेला. तो घाटकोपरच्या वाधवा सोसायटीच्या आवारात जाताच तेथेही चालकाने गाडी पुढे घेत त्याला थांबवून डीव्हाईज देण्याची विनंती केली. तेव्हा ऋषभने त्याला बेदम मारहाण करत उचलून क्रूरपणे जमिनीवर आपटले. या प्रकारानंतर २० मिनिट बेशुद्ध होतो. मदतीसाठी कोणीही पुढे आले नाही. त्यानंतर, शुद्धीवर आल्यानंतर त्याच स्थितीत तेथील सुरक्षा रक्षकांनी ओला गाडीचा डिव्हाईस परत केल्यानंतर तेथून गेल्याचे म्हटले आहे.

चौकशीअंती कारवाई...पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्याच्या आरोप फेटाळत चक्रवर्ती आणि त्याच्या पत्नीला नोटीस बजावत चौकशीअंती अटकेची कारवाई करण्यात येईल असे पार्क साईट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घाटेकर यांनी सांगितले.

टॅग्स :गुन्हेगारीमुंबईपोलिस