मुंबई : झवेरी बाजारातील ईडीचा अधिकारी असल्याचे सांगून लुटीची घटना ताजी असतानाच, दादरमधील गजबजलेल्या अशा कीर्ती कॉलेजजवळील हाउसिंग सोसायटीत भरदिवसा रिव्हॉल्व्हरच्या धाकात वयोवृद्धेच्या घरात करण्यात आलेल्या लुटीच्या घटनेने खळबळ उडाली. धक्कादायक बाब म्हणजे त्यांच्याकडे चालक म्हणून काम करणाऱ्या नोकरानेच मित्राच्या मदतीने ही लूट केली. याप्रकरणी दादर पोलिसांनी चालक संतोष भागोजी कडव (३८) याच्यासह त्याचा नवी मुंबईतील साथीदार किसन ऊर्फ कृष्णा रामचंद्र भुवड ऊर्फ भौड (५२) यालाही अटक केली आहे.
दादर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश मुगुटराव यांच्या नेतृत्वात तपास अधिकारी विजय कदम, रामकृष्ण सागडे, भगवान पायघन, राजेंद्र रावराणे यांच्या पथकाने गुन्ह्याची उकल केली आहे. दादर येथील काशिनाथ धुरू मार्गावरील एका इमारतीच्या आठव्या मजल्यावर ७० वर्षीय वयोवृद्धा पतीसोबत राहतात. सोमवारी सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास त्यांच्या दरवाजाची बेल वाजली. वयोवृद्धा यांनी दरवाजा उघडताच समोर अनोळखी व्यक्ती उभा होता. त्याने आदल्याच दिवशी सोसायटीतील रायकर नावाच्या रहिवाशाने नातीच्या जन्माबद्दल मिठाई वाटली होती. त्यांनी पुन्हा मिठाई पाठविल्याचे सांगून घरात प्रवेश केला. वयोवृद्धेने सेफ्टी दरवाजा उघडताच त्या व्यक्तीने घरात घुसून वयोवृद्धेचा गळा दाबला. पिस्तूल डोक्याला लावत दागिन्यांची विचारणा केली. सुमारे १० ते १२ लाख रुपये किंमतीचे २० ते २५ तोळे वजनाचे दागिने काढून घेतले. त्यांना एका खुर्चीवर बसवून त्यांचे हातपाय बांधून पळ काढला.
...अन् आरोपी जाळ्यात घटनाक्रम आणि महिलेबाबत सर्व माहिती आरोपींना होती. त्यामुळे यामध्ये जवळच्या व्यक्तीचा हात असल्याचा संशय पोलिसांना आला. यादरम्यान चालक संतोषच्या संशयास्पद हालचाली पोलिसांनी टिपल्या. त्याला ताब्यात घेताच चोकशी सुरू केली. अखेर त्याने गुन्ह्याची कबुली देताच त्याच्यासह मित्राला अटक केली आहे.
लुटीसाठी खेळण्यातल्या बंदुकीचा वापर आरोपींनी गुन्ह्यात खेळण्यातील पिस्तूल वापरल्याची माहिती समोर आली. तक्रारदार दाम्पत्याचा जुना चालक नोकरी सोडून गेल्याने सहा महिन्यांपूर्वीच संतोष त्यांच्याकडे नोकरीला होता.