Join us

एमआयडीसीवर झालेल्या सायबर हल्ल्याप्रकरणी गुन्हा नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2021 4:07 AM

सायबर पोलिसांकड़ून तपास सुरुएमआयडीसीवर झालेल्या सायबर हल्ल्याप्रकरणी गुन्हा नोंदसायबर पोलिसांकडून तपास सुरूलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई ...

सायबर पोलिसांकड़ून तपास सुरु

एमआयडीसीवर झालेल्या सायबर हल्ल्याप्रकरणी गुन्हा नोंद

सायबर पोलिसांकडून तपास सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचा (एमआयडीसी) सर्व्हर हॅक केल्याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला. या हल्ल्यामुळे एमआयडीसीची संपूर्ण संगणक यंत्रणा बंद पडली होती. याप्रकरणी सायबर पोलीस अधिक तपास करत आहेत.

एमआयडीसीच्या संगणकीय प्रणालीवर २१ मार्च २०२१ रोजी पहाटे २.३०च्या सुमारास रेन्समवेअरचा सायबर हल्ला झाल्याने महामंडळाची संपूर्ण संगणक यंत्रणा बंद पडली होती. हॅकर्सने एमआयडीसीच्या अधिकृत मेल आयडीवर खंडणीचा मेल पाठवला. मात्र खंडणीच्या रकमेचा थेट उल्लेख केला नाही. मागणी मान्य न केल्यास संपूर्ण महत्त्वाचा डाटा नष्ट करू, अशी धमकी देण्यात आली. एमआयडीसीने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या सर्व प्रणाली ईएसडीएस (Cloude सेवा प्रदाता) आणि महामंडळाअंतर्गत स्थानिक सर्व्हरवर आहेत. तसेच सुरक्षा व देखरेखीसाठी ट्रेंड मायक्रो अँटिव्हायरसचा वापर केला जातो. सिनॅक या रॅन्समवेअरने एमआयडीसीच्या मुख्यालयात होस्ट केलेली लोकल सर्व्हर सिस्टीम आणि डेटाबेस सेवांवर परिणाम केला आहे. तसेच राज्यातील प्रादेशिक कार्यालयांमध्ये असलेल्या संगणकांनाही याचा फटका बसला.

सायबर सुरक्षा तज्ज्ञांच्या मदतीने अधिक चौकशी सुरू आहे. याप्रकरणी माहिती तंत्रज्ञान कायदा ३००७ कलम ४३ (अ), (फ़), ६६ अन्वये बुधवारी अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला. सायबर पोलीस अधिक तपास करत असल्याची माहिती मुंबई पोलीस प्रवक्ते चैतन्या एस. यांनी दिली.

...

* या फाइल्स सुरक्षित

सायबर हल्ल्यानंतर संगणकीय यंत्रणेत व्हायरसचा प्रसार होऊ नये यासाठी नेटवर्कवरून संगणक तातडीने डिस्कनेक्ट करण्यात आले आहेत. महामंडळाची एक खिडकी योजना, इआरपी, बीपीएएमएस, संगणकीय भूवाटप प्रणाली व पाण्याची देयके या यंत्रणांच्या बॅकअप फाइल्स वेगळ्या नेटवर्कवर संग्रहित केल्या असून त्या सर्व सुरक्षित असल्याची माहिती एमआयडीसी विभागाने दिली.

* या सेवा सुरू

महामंडळाचे संकेतस्थळ, एक खिडकी योजना (एसडब्ल्यूसी), बीपीएएमएस या ग्राहकाभिमुख सेवा योग्य सुरक्षा तपासणी करून सुरू करण्यात आल्या आहेत. तसेच ईआरपी-पाण्याची देयक यंत्रणा (इआरपी-डब्ल्युबीएस), इंटिग्रेटेड फाईल मॅनेजमेंट सिस्टीम (आयएफएमएस) या यंत्रणा ३१ मार्च २०२१पर्यंत पुन्हा कार्यान्वित करण्यात येतील, अशीही माहिती देण्यात आली.

* यापूर्वी चीनी सायबर हल्ला

गेल्या वर्षी मुंबई आणि परिसरातील वीज गायब झाल्यामुळे झालेल्या ब्लॅकआऊटमागे चिनी सायबर हल्ल्याचा संशय गृहमंत्री आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी व्यक्त केला होता. त्यानंतर आता एमआयडीसीचा डेटा हॅक झाल्याची माहिती समोर येताच संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. यामागेही त्याचे काही कनेक्शन आहे का? याबाबतही अधिक तपास सुरू आहे.