Crime : घाटकोपरमधील त्या जोडप्याचा मृत्यूबाबत धक्कादायक माहिती समोर, गिझरमुळे नाहीतर या कारणामुळे झाला मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2023 12:43 PM2023-03-11T12:43:11+5:302023-03-11T12:44:43+5:30
Ghatkopar Couple Death Update: घाटकोपरमधील शाह दाम्पत्याचा मृत्यू हा गिझरमधून गॅस लिक झाल्यामुळे गुदमरून झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र आता त्यांच्या मृत्यूबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.
रंग खेळून आल्यानंतर घाटकोपरमधील एक जोडपं मृतावस्थेत सापडल्यामुळे खळबळ उडाली होती. दरम्यान, दीपक शाह आणि टीना शाह या जोडप्याचे मृतदेह घरातील बाथरूममध्ये सापडले होते. त्यांचा मृत्यू गिझरमधून गॅस लिक झाल्यामुळे गुदमरून झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र आता शाह दाम्पत्याच्या मृत्यूबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यांचा मृत्यू भांग पिल्याने त्यातून विषबाधेसारखा प्रकार होऊन झाल्याचा अंदाज डॉक्टरांनी वर्तवला आहे.
मित्रांसोबत होळी खेळून आल्यानंतर दीपक शाह आणि टीना शाह हे दाम्पत्य आंधोळीसाठी बाथरूममध्ये गेले होते. तिथेच त्यांचा मृत्यू झाला होता. बुधवारी मोलकरीण घरी आली असताना बेल वाजवूनही दरवाजा उघडला गेला नाही. तेव्हा शेजारील इमारतीत राहणाऱ्या नातेवाईकांकडील दुसऱ्या चावीने घराचा दरवाजा उघडण्यात आला. तेव्हा हे पती-पत्नी मृतावस्थेत सापडले. बाधरूममध्ये त्यांच्या मृतदेहाजवळ उलटी केल्याच्या खुणाही दिसून आल्या होत्या. तसेच शॉवर आणि गिझर बंद केलेल्या स्थितीत होते.
दरम्यान, त्यांचे मृतदेह हे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. तसेच त्यांच्या पोटात सापडलेले रासायनिक पदार्थ, उलटीच्या खुणा आणि इमारतीमधील सीसीटीव्ही फुटेज यांच्या माध्यमातून तपास सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, धुलिवंदनादिवशी दीपक शाह आणि टीना शाह हे घरापासून जवळच असलेल्या छेडानगर जंक्शन येथे दिसले होते. मात्र नंतर रात्री साडेनऊ वाजेपर्यंत ते कुठे होते, याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. या काळात ते कुठे होते. याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.
दरम्यान, शाह दाम्पत्याच्या मृत्यूच्या कारणाबाबत वेगवेगळे अंदाज वर्तवले जात होते. त्यातच आता पोलीस आणि डॉक्टरांनी मृत्यूमागे भांग हे अल्कोहोलसारख्या विषबाधेचे कारण असू शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे. तसेच पाण्यात भिजल्यामुळे त्यांच्या मृतदेहांची त्वचा ही सैल झाली होती. गुरुवारी त्यांच्या मृतदेहाचं शवविच्छेदन झालं आहे. तसेच पुढील विश्लेषणासाठी व्हिसेरा आणि आवश्यक पेशींचे जतन करून ठेवण्यात आले आहे.
समोर येत असलेल्या माहितीनुसार दीपक यांचे दुसरे लग्न झालेले आहे. पहिल्या पत्नीसोबत त्यांचा घटस्फोट झाला होता. त्यांना दोन मुले आहेत. दरम्यान, त्यांच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीलाही चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. तसेच ज्यांनी शाह दाम्पत्याला हल्लीच्या काळात फोन केला होता, अशांचेही जबाब नोंदवून घेतले जात आहेत.