मृतदेहावरील वार पाहून ८ तासांत गुन्ह्याची उकल, एकाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2022 12:46 PM2022-01-29T12:46:07+5:302022-01-29T12:46:45+5:30

हत्येप्रकरणी बोरीवली रेल्वे पोलिसांकडून एकाला अटक

Crime solved in 8 hours after seeing the blow on the dead body | मृतदेहावरील वार पाहून ८ तासांत गुन्ह्याची उकल, एकाला अटक

मृतदेहावरील वार पाहून ८ तासांत गुन्ह्याची उकल, एकाला अटक

Next

मुंबई : छिनविच्छिन्न झालेला मृतदेह कांदिवली रेल्वे रुळावर गुरुवारी रात्री साडेबाराच्या सुमारास मिळाल्यावर सुरुवातीला तो अपघात असल्याचेच सर्वांना वाटले. मात्र बोरीवली पोलिसांनी त्याच्या पायावर चाकूने केलेले वार पाहिले आणि अत्यंत शिताफीने तपास करत ती हत्या असल्याचे उघड करून आरोपी अशोक मुखीया (१९) याला आठ तासांत गजाआड केले. गणेश मुखीया (२२) असे मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

गुरुवारी रात्री बोरीवली पोलिसांकडून   कांदिवली आणि बोरीवली रेल्वे रुळामध्ये मृतदेह असल्याची माहिती रेल्वे पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस उपायुक्त संदीप भाजी भाकरे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल कदम यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकाने त्याठिकाणी धाव घेतली. सुरुवातीला लोकलमधून पडून किंवा लोकलची धडक लागल्याने हा मृत्यू झाल्याचे वाटत होते. मात्र हमालांमार्फत जेव्हा मृतदेह रेल्वे प्लॅटफॉर्मवर आणण्यात आला. तेव्हा मृतदेहाचे तुकडे पोलिसांनी निरखून पाहिले. ज्यात त्याच्या पायावर चाकूने वार झाल्याचे निदर्शनास आले आणि ती हत्या असल्याचे उघड झाले. त्याच्याशेजारी एक मोबाइल पडला होता ज्यावर त्याचे सहकारी त्याला फोन करत होते. त्यानुसार त्यांना पोलिसानी बोलावून घेत त्यांची चौकशी केली. ज्यात आरोपीचा समावेश होता जो मृत झालेल्या गणेश याच्या काळजीत असल्याचा दिखावा करत होता. त्यानुसार पोलिसांनी सीसीटीव्ही पडताळले आणि त्यात गणेश हा आरोपीसोबत जाताना दिसला, मात्र अशोक एकटा परतला. यावरून पोलिसांचा संशय वाढला आणि त्यांनी अशोकची चौकशी केली. त्यात त्याने गुन्हा कबूल केला. 

अशोकच्या आईचे निधन झाले असून त्याची सावत्र आई ही तरुण आहे. गणेशला आरोपी काम शिकवत असताना त्याच्या सावत्र आईसोबत त्याचे अनैतिक संबंध असल्याच्या अश्लील टिप्पणी करायचा. त्यामुळे अशोकचा त्याच्यावर राग होता आणि त्याचा काटा काढायचे त्याने ठरविले. आरोपीने एक दिवस आधी भाजी कापण्याचा चाकू आणून ठेवला. गुरुवारी रात्री गणेशला सोबत नेत दारू पाजली आणि त्यातच त्याच्यावर चाकूने हल्ला करत त्याला रुळावर फेकून निघून गेला. मुख्य म्हणजे गणेशचा शोध त्याचे अन्य सहकारी घेत असताना अशोकसुद्धा त्याला शोधण्याचा आव आणत होता.

आमच्या पथकाने मृतदेहाचे निरीक्षण केल्याने ती हत्या असल्याचे उघड झाले आणि आठ तासात मारेकऱ्याला अटक केली. त्यासाठी सर्वांचे अभिनंदन करतो. 
- संदीप भाजीभाकरे, पोलीस उपायुक्त, पश्चिम परिमंडळ

Web Title: Crime solved in 8 hours after seeing the blow on the dead body

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.