मुंबई : स्वस्तामध्ये नवी गाडी आणि जेसीबी मिळवून देण्याचे आमिष दाखवत पोलिसानेपोलिसाला आणि मंत्रालयात कार्यरत असलेल्या त्याच्या मित्राला एकूण ११ लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी खेरवाडी पोलिसांनी गणेश सरवदे नामक पोलिसावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
तक्रारदार पोलिस शिपाई विलास कोळी (३४) यांच्या तक्रारीनुसार, संरक्षण व सुरक्षा विभागात कार्यरत असताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान मातोश्री बंगल्यावर त्यांची नेमणूक झाली. तिथे तैनात पोलिस शिपाई गणेश तुकाराम सरवदे याच्याशी त्यांची ओळख झाली. तो संरक्षण व तांत्रिक सुरक्षा विभागात कार्यरत होता. त्याच्या ओळखीचा योगेश अहिरे हा वाहने कमी किमतीत विकतो, असे सरवदे याने सांगितले. कोळी यांना एर्टिगा सीएनजी गाडी घ्यायची होती, ज्याची किंमत सरवदे यांनी ७ लाख सांगितली. तेव्हा कोळी यांनी कर्ज काढत रक्कम कर्नाटक बँकेच्या सोलापूर शाखेत सरवदेचा भाऊ यतीराज याच्या खात्यावर टाकली. मात्र, गाडी मिळाली नाही.
कोरोनाचे कारण दिले सरवदेने कोरोनाचे कारण पुढे करत पासिंग व डिलिव्हरीसाठी वेळ लागेल, असे उत्तर दिले. कोळी यांच्या सांगण्यावरून गृह मंत्रालयातील सहायक कक्ष अधिकारी असलेले त्यांचे मित्र विशाल पाटील यांनीही सरवदेला नवा जेसीबी घेण्यासाठी २० लाख ५० हजार रुपये दिले. हे पैसे स्वराज इंटरप्राईजेस या नावाने सारस्वत बँकेत पाठवण्यास सांगितले. मात्र, दोघांनाही गाड्या दिल्या नाहीत. सतत पाठपुरावा केल्यावर थोडी थोडी रक्कम परत केली. मात्र, अजूनही दोघांचे मिळून ११ लाख रुपये त्याने दिले नाही. दीड वर्ष तो त्यांना टाळत असल्याचे कोळी यांनी सांगितले.