नवीन पनवेल : संबंधित विभाग आणि शासनाची कोणतीही परवानगी न घेता अनधिकृतरीत्या कलावंतीण सुळक्यावर प्रबळगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांची दीड फूट उंचीची व १२ किलो वजनाची सिंहासनावर बसलेल्या मूर्तीची स्थापना करून स्मारकाचे उद्घाटन केल्याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पनवेल तालुका पोलीस ठाणे हद्दीतील कलावंतीण सुळका, माची प्रबळगड या ठिकाणी राजे प्रतिष्ठान (दुर्गसंवर्धन विभाग) महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे उद्घाटन करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या अनुषंगाने २५ मार्च रोजी पनवेल तालुका अध्यक्ष सतीश हातमोडे (वय ३०, रा. तूरमाळे), संस्थेचे अध्यक्ष राहुल शशिकांत महाजन (वय ३२, रा. कोळसेवाडी, कल्याण) यांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांनी कार्यालयात बोलावून बैठक घेतली होती. या बैठकीत सार्वजनिक किंवा खासगी जागेत पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येणे, थांबणे, चर्चा करणे या प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन केल्यास कोरोना संसर्ग व प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक बसविण्यापूर्वी संबंधित विभाग व महाराष्ट्र शासनाची रीतसर परवानगी घेण्याबाबत पोलिसांनी त्यांना समज दिली होती. पोलिसांनी सतीश हातमोडे आणि राहुल महाजन यांना फौजदारी प्रक्रियासंहिता कलम १४९ अन्वये प्रतिबंधात्मक नोटीस दिली होती. २७ मार्च रोजी कलावंतीण सुळका माची प्रबळ येथे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला होता. या वेळी सतीश हातमोडे, आशिष जाधव, समाधान पाटील, राहुल महाजन व इतर दहा ते पंधरा पदाधिकाऱ्यांनी कोणतीही परवानगी न घेता महाराजांची दीड फूट उंचीची व १२ किलो वजनाची सिंहासनावर बसलेल्या मूर्तीची स्थापना केली आणि दोन फुटांचे सात ते आठ किलो वजनाचे राज छत्र लावून स्मारकाचे उद्घाटन केले. शासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी आणि कलम १४९ प्रमाणे दिलेल्या नोटिसीचा भंग केल्याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.