मुंबई : लोकल, ट्रेनमधून प्रवास करतानाच रेल्वे हद्दीत होणाऱ्या गुन्ह्यांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पश्चिम रेल्वे सुरक्षा दलाकडून करण्यात आलेल्या कारवाईत दोन वर्षांत १0९ जणांना अटक करण्यात आली असून यात सर्वाधिक ९८ जणांना अटक २0१५ मध्येच करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. पश्चिम रेल्वेचा आवाका हा चर्चगेटपासून डहाणूपर्यंत असून या मार्गावरून जवळपास ३५ ते ४0 लाखांदरम्यान प्रवासी प्रवास करतात. एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी ही आरपीएफ (रेल्वे सुरक्षा दल) आणि जीआरपीवरही (गव्हर्नमेंट रेल्वे पोलीस) आहे. याचबरोबर आरपीएफकडून रेल्वेच्या मालमत्तेचीही सुरक्षा केली जाते. २0१५ मध्ये पश्चिम रेल्वे आरपीएफमध्ये चोरी, दरोडा, महिलांबाबतीतील गुन्ह्यांची नोंद मोठ्या प्रमाणात झाली आहे. ७७ केसेस दाखल झाल्या असून यात ९८ जणांना अटक करण्यात आल्याचे आरपीएफकडून सांगण्यात आले. २0१४ पेक्षाही ही नोंद अधिक आहे. २0१४ मध्ये आरपीएफकडे ९ केसेसची नोंद होती आणि यात ११ जणांना अटक करण्यात आली होती. (प्रतिनिधी)
पश्चिम रेल्वेतील गुन्हेगारीत वाढ
By admin | Published: January 19, 2016 2:32 AM