Join us

पासपोर्ट सेवा केंद्रांना भ्रष्टाचाराची वाळवी; १४ अधिकाऱ्यांवर गुन्हे तर अनेकजण सीबीआयच्या रडारवर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2024 6:58 AM

सीबीआयने यापूर्वी १४ पासपोर्ट अधिकाऱ्यांसह ३२ जणांविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत शुक्रवारी १२ गुन्हे दाखल नोंदवले आहेत

मुंबई : मालाड, लोअर परळ येथील पासपोर्ट सेवा केंद्रांच्या अधिकाऱ्यांवर सीबीआयने केलेल्या कारवाईने खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पासपोर्ट सेवा केंद्राचे अधीक्षक आणि उपपासपोर्ट अधिकाऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये दलालांनी ट्रान्सफर केलेले व्यवहार  हाती लागल्याने आणखी अधिकारी सीबीआयच्या रडारवर आले आहेत.

सीबीआयने यापूर्वी १४ पासपोर्ट अधिकाऱ्यांसह ३२ जणांविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत शुक्रवारी १२ गुन्हे दाखल नोंदविले. हे सर्व लोअर परळ आणि मालाडच्या पासपोर्ट सेवा केंद्रांवर (पीएसके) येथे कार्यरत होते. पासपोर्ट अधिकारी संबंधित दलालांसोबत मिळून भ्रष्टाचार करत असल्याचा आरोप आहे. ते नियमित या दलालांंच्या संपर्कात होते. संबंधित अधिकारी अपुऱ्या व बनावट कागदपत्रांद्वारे दलालांमार्फत ग्राहकांना पासपोर्ट जारी करत होते. तपासादरम्यान पासपोर्ट सेवा केंद्रांवरील पारपत्र सहायक आणि दलालांशी संबंधित मुंबई व नाशिकमधील ३३ ठिकाणी सीबीआयने सर्च ऑपरेशन राबविले. या कारवाईत महत्त्वपूर्ण कागदपत्रे हाती लागली आहेत.

बँक खात्यांची झाडाझडती 

सीबीआयने लोअर परळ येथील पासपोर्ट सेवा केंद्राचे अधीक्षक उमेश देवाढीया, मालाड केंद्रातील उपपासपोर्ट अधिकारी प्रज्ञा प्रदीप वानखेडेवर आणि दलालांविरुद्ध नव्याने दोन गुन्हे पाच जुलैला नोंदविले आहेत. दलाल शेख मुझम्मील याच्या बँक खात्यातून ऑक्टोबर २०२० ते जून २०२४ दरम्यान उमेश यांच्या बँक खात्यात ४ लाख ८ हजार आल्याचे दिसून आले. तसेच मे २०२३ ते मे २०२४ दरम्यान एसबीआय बँक खात्यात ७ लाख ३७ हजारांचे संशयास्पद व्यवहारदेखील सीबीआयच्या हाती लागले आहेत. आतापर्यंतच्या तपासात पत्नी, मित्र आणि नातेवाइकांच्या बँक खात्यांत दलालांकडून पैसे ट्रान्सफर झाल्याचेही समोर आले असून, त्यानुसार कुटुंबीयांच्या बँक खात्यांची झाडाझडती सुरू आहे.

कोट्यवधी रुपये कमविल्याचा संशय

दुसऱ्या गुन्ह्यात प्रज्ञा यांच्या दोन बँक खात्यांत ५१ लाखांचे संशयास्पद व्यवहार आढळले. ही रक्कम दलाल मुझम्मील शेख, सुलेमान शेख, मेहुल देसाईसह अन्य दलालांच्या बँक खात्यांतून आल्याचे सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यात नमूद केले आहे. यामुळे आणखी अधिकारी सीबीआयच्या रडारवर असून, त्यांनी भ्रष्टाचारातून कोट्यवधी रुपये कमविल्याचा संशय सीबीआय अधिकाऱ्यांना आहे. 

असा उघड झाला भ्रष्टाचार

पासपोर्ट सेवा केंद्रात पैसे घेऊन कामे होत असल्याच्या तक्रारी सीबीआयकडे आल्या. त्यानुसार दि. २६ जूनला परळ व मालाड येथील पासपोर्ट सेवा केंद्रांवर सीबीआयच्या अधिकाऱ्यांसह दक्षता विभागाचे अधिकारी व विभागीय पासपोर्ट कार्यालयातील अधिकाऱ्यांनी अचानक तपासणी केली. त्यावेळी संशयित अधिकाऱ्यांच्या कार्यालयाची व मोबाइलची तपासणी करण्यात आली. कागदपत्रे, सोशल मीडियावरील संदेश व यूपीआयवरील व्यवहारांचीही तपासणी केली असता संबंधित अधिकाऱ्यांचे दलालांसोबत व्यवहार आढळून आले. दलालांचे काम केल्याच्या बदल्यात हे व्यवहार झाल्याचा संशय आहे.

टॅग्स :मुंबईपासपोर्टगुन्हा अन्वेषण विभागगुन्हेगारी