लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अभिनेते जॅकी श्रॉफ यांची पत्नी आयेशा श्रॉफ यांनी अभिनेता साहिल खानविरोधात दाखल केलेले फसवणुकीबद्दलचे दोन एफआयआर मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी फेटाळले.
वांद्रे पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेले दोन्ही एफआयआर न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि एन. जे. जमादार यांच्या खंडपीठाने रद्द केले. चार कोटी रुपयांची फसवणूक आणि इतर आरोपांचा पाठपुरावा न करण्याचा निर्णय घेतल्याचे श्रॉफ यांनी कोर्टाला सांगितले. दोन्ही बाजूंनी परस्पर सहमतीने हा वाद मिटविल्याचे वकिलांनी सांगितले. व्यावसायिक वादातून हे प्रकरण उद्भवल्याचे निरीक्षण खंडपीठाने नोंदविले आणि दोन्ही बाजूंचे म्हणणे मान्य केले. मात्र, खानला या प्रकरणात खर्चापोटी एक लाख रुपये देण्याचे आदेश न्यायालयाने दिले. ही रक्कम महाराष्ट्र बालकल्याण समितीकडे भरण्यास सांगितले.