Join us

मुंबईकरांना लुटणाऱ्या क्लीनअप मार्शलांवर गुन्हा; महापालिकेने उगारला बडगा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2021 1:34 PM

महापालिकेने उगारला बडगा; नागरिकांना नाहक त्रास

मुंबई : क्लिन अप मार्शलची अरेरावी, नागरिकांबरोबर उडणारे खटके आता पालिकेसाठी डोकेदुखीचे कारण ठरत आहे. अशा काही घटना समोर आल्या आहेत. याची गंभीर दखल घेत  दमदाटी करून चुकीच्या पद्धतीने पैसे उकळणाऱ्या मार्शल्सवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. पालिका ही कारवाई करणार आहे.

रस्त्यांवर कचरा टाकणाऱ्या व थुंकणाऱ्या लोकांवर पालिकेच्या उपद्रव शोध पथकामार्फत कारवाई केली जात असे. मात्र, मुंबईतील लोकसंख्येच्या तुलनेत या कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने २००६ मध्ये क्लीन-अप मार्शल ही संकल्पना आणण्यात आली. त्यानुसार सार्वजनिक परिसर अस्वच्छ करणाऱ्या लोकांवर कारवाई करण्याचे अधिकार त्यांना देण्यात आले. 

तोडपाणी, अरेरावी वाढली

मार्शलमार्फत होणारी कारवाई नागरिकांनी कधी स्वीकारलीच नाही. त्यात काही मार्शल दंड कमी करण्यासाठी अथवा सोडण्यासाठी तोडपाणी करू लागले; तर प्रामाणिकपणे काम करणाऱ्या काही मार्शलला नागरिकांच्या मारहाणीचा सामना करावा लागला. अशा काही तक्रारी येऊ लागल्याने पालिकेने मधल्या काही काळात क्लीन-अप मार्शल ही योजना गुंडाळली होती. मात्र, कालांतराने नियमात काही बदल केल्यानंतर क्लीन अप मार्शल पुन्हा रुजू झाले. कोविडचा प्रसार रोखण्यासाठी मास्क न लावणाऱ्या लोकांना दंड करण्याचे अधिकार त्यांना आता देण्यात आले आहेत.

सोमवारी बैठक

काही दिवसांपूर्वी एका स्टिंग ऑपरेशनमध्ये क्लीन अप मार्शलकडून सुरू असलेली लूट समोर आली. याची गंभीर दखल घेऊन संबंधित मार्शलवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी शनिवारी सांगितले; तर संबंधित ठेकेदाराबरोबर बैठक आयोजित करून योग्य तो निर्णय घेण्यात येणार आहे. तसेच याप्रकरणी सोमवारी आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी एक बैठक होणार असून, त्या बैठकीत कारवाईबाबत निर्णय होईल, असे त्यांनी सांगितले.

अशी होणार कारवाई

महापालिकेच्यावतीने नेमण्यात आलेल्या २४ विभागांमधील ज्या संस्थांविरोधात तक्रारी आल्या आहेत, त्यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करून त्यांची हकालपट्टी करण्यात येणार आहे. तर उर्वरित सर्व संस्थांना कारणे दाखवा नोटीस बजावून त्यांच्याकडून स्पष्टीकरण तसेच त्यांच्या प्रत्येक कर्मचाऱ्याचे पोलीस ठाण्यातून चारित्र्य प्रमाणपत्र सादर करण्याचे निर्देश देण्यात येणार आहेत.

बोगस मार्शलचा सुळसुळाट

क्लीन अप मार्शल यांना त्यांची ओळख दर्शविणारा गणवेश घालणे बंधनकारक आहे. मात्र अनेकवेळा गणवेश परिधान न करताच काही मार्शल फिरताना दिसतात. याचा फायदा उठवून काही बोगस व्यक्ती लोकांना ठगत आहेत. 

टॅग्स :मुंबई महानगरपालिकामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस