मुंबई- दोन दिवसापूर्वी मुंबईतील मरीन लाईन्स येथील महिलांच्या वसतीगृहात एका तरुणीची हत्या झाली, तर आज मीरा रोड परिसरात लीव्ह इनमध्ये राहणाऱ्या महिलेची हत्या झाल्याचे समोर आले आहे, यावरुन राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या प्रकरणी फास्ट ट्रॅक कोर्टात कारवाईची मागणी करत राज्यातील गुन्हेगारीकडे गांभीर्याने लक्ष देण्याचा सल्ला दिला आहे.
प्रेयसीच्या शरीराचे तुकडे शिजवून कुत्र्याला घातले; मीरा रोडमध्ये थरकाप उडवणारी घटना
खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबईसह महाराष्ट्रातील गुन्हेगारीवरुन ट्विट करत कारवाईची मागणी केली आहे. मुंबई येथील मीरा रोड परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीने आपल्या लिव्ह इन् पार्टनरची हत्या केली. नंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे कुकरमध्ये शिजवून व मिक्सरमध्ये बारीक करुन त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. ही घटना अतिशय भीषण, अमानुष आणि संतापजनक आहे.
गुन्हेगारांना या राज्यात कायद्याचा धाक शिल्लक राहिलाच नाही अशी ही स्थिती आहे. महिलांवरील गुन्हे संतापजनक पद्धतीने वाढत आहेत. राज्याच्या गृहमंत्र्यांनी आपल्या खात्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे, असा सल्लाही सुळे यांनी फडणवीसांना दिला आहे.
तसेच या प्रकरणातील आरोपीवर फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे यासाठी तपासयंत्रणांनी प्रयत्न करावे, अशी मागणीही खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
दोन दिवसापूर्वी मुंबईतील मरीन लाईन परिसरातील मरीन ड्राईव्ह सावित्रीबाई फुले वसतिगृहात एका खोलीत तरुणीचा विवस्त्र अवस्थेत मृतदेह आढळून आल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सायंकाळच्या सुमारास समोर आली. बलात्कार करून तरुणीची हत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. तर आज मीरा रोडमध्ये लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या ५६ वर्षीय प्रियकराने ३२ वर्षीय प्रेयसीची हत्या करून तिचे कटरने लहान लहान तुकडे केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपीने तिच्या शरीराचे तुकडे शिजवून कुत्र्याला खायला घातल्याचे पाेलिस सूत्रांनी सांगितले. पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी त्याला अटक केल्याची घटना समोर आली.