लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : ठाणे जिल्ह्यातील पाणी पुरवठ्याचा प्रश्न मिटवण्यासाठी काळू धरण बांधले जात आहे. त्यासाठी वनविभागाकडून जागा घेण्यात आली असून, या जागेपोटी एमएमआरडीएकडून वनविभागाला ३५० कोटी रुपये देण्यात आले आहेत. या धरणासाठीही आम्ही युद्धपातळीवर काम करत आहोत, असे सांगताना अनधिकृत पाण्याच्या कनेक्शनवर कठोर कारवाई केली जाईल, संबंधितांवर गुन्हे दाखल करून जेलमध्ये टाकले जाईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी विधानसभेत दिले.
ठाणे शहरातील पाणीटंचाई लक्षात घेऊन एमआयडीसीच्या बारवी धरणातून तात्पुरता पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.
बारवीतून पाणीपुरवठा
एमआयडीसीच्या बारवी जलाशयातून ठाणे शहराला तात्पुरता पाणीपुरवठा करण्यासंदर्भातील प्रस्ताव जलसंपदा विभागाकडे पाठवण्यात आला आहे. त्याचा युद्धपातळीवर पाठपुरावा करून ठाणे शहरासाठी वाढीव पाणीपुरवठा केला जाईल, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील मुंब्रा आणि कळवा या परिसरात पाण्याची कृत्रिम टंचाई जाणवत असल्याबाबत आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडली होती. मुंब्रा परिसराला मंजूर असलेला पाणी कोटा जाणीवपूर्वक कमी करण्यात येत आहे. या भागात दूषित पाणीपुरवठा केला जात आहे, असा मुद्दा आव्हाड यांनी लक्षवेधीद्वारे उपस्थित केला होता.