वसई : नालासोपारा परिसरात अनधिकृत बांधकाम करणाऱ्या १०२ चाळमाफियांवर नालासोपारा पोलीस ठाण्यात एमआरटीपी कायद्याखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गेल्या काही वर्षात या चाळमाफियांनी नालासोपारा शहरात शेकडो अनधिकृत इमारती बांधल्या आहेत. आता या चाळमाफियांवर नालासोपारा पोलीस कोणती कारवाई करतात? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.नालासोपारा पूर्व भागातील अलकापुरी, नगीनदासपाडा, संतोषभुवन, आचोळे रोड व वसई-विरार रोड या भागात शेकडो अनधिकृत इमारती (लोड बेअरिंग) उभ्या राहिल्या आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महानगरपालिकेने हद्दीतील सुमारे ८ हजार इमारतींवर हातोडा चालविला, परंतु त्यानंतरही अनधिकृत बांधकामे काही थांबली नाहीत. मध्यंतरीच्या काळात या चाळमाफियांनी वसई न्यायालयातून स्थगिती मिळविल्याने महानगरपालिकेने आपली मोहीम स्थगित केली होती. नेमका त्याचाच फायदा घेत या चाळमाफियांनी डोके वर काढले व अनधिकृत कामे करण्यास सुरूवात केली. अखेर महानगरपालिकेच्या नालासोपारा विभागीय कार्यालयातील प्रभारी सहाय्यक आयुक्त सुरेंद्र पाटील यांनी नालासोपारा पोलीस ठाण्यात १०२ चाळमाफियांवर एमआरटीपी कायद्याखाली गुन्हे दाखल केले आहे. या सर्व चाळमाफियांविरोधात नालासोपारा पोलीस कोणती भूमिका घेते याकडे लक्ष लागले. (प्रतिनिधी)
चाळमाफियांवर गुन्हे दाखल
By admin | Published: July 01, 2014 11:55 PM