देशपांडे आणि धुरींवर दाखल केलेले गुन्हे काल्पनिक, कोर्टाने फटकार लगावत काढली पोलिसांची खरडपट्टी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2022 23:21 IST2022-05-21T23:20:22+5:302022-05-21T23:21:27+5:30
MNS News: पोलिसांना चकवा देत पळालेल्या संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्याविरोधात पोलिसांनी अनेक गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल केले होते. मात्र आता सत्र न्यायालयाने त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. तसेच या प्रकरणी कोर्टाने पोलिसांनाही फटकार लगावली आहे.

देशपांडे आणि धुरींवर दाखल केलेले गुन्हे काल्पनिक, कोर्टाने फटकार लगावत काढली पोलिसांची खरडपट्टी
मुंबई - मशिदींवरील भोंग्यांना विरोध करत हनुमान चालिसा पठण करण्याचे आदेश राज ठाकरे यांनी दिल्यानंतर राज्यात पोलिसांकडूनमनसेच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू होती. दरम्यान मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी हे राज ठाकरेंसोबत बैठकीमध्ये सहभागी होण्यासाठी शिवतीर्थ येथे आले असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तेव्हा ते पोलिसांना गुंगारा देऊन पसार झाले होते. त्यानंतर संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्याविरोधात पोलिसांनी अनेक गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल केले होते. मात्र आता सत्र न्यायालयाने त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. तसेच या प्रकरणी कोर्टाने पोलिसांनाही फटकार लगावली आहे.
पोलिसांनी संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्याविरोधात काल्पनिक गुन्हे नोंदवल्याचं निरीक्षण नोंदवत कोर्टाने पोलिसांना फटकार लगावली आहे. देशपांडे आणि धुरी यांच्याविरोधात नोंदवलेले गुन्हे कुठल्याही तथ्यांवर आधारित नसून काल्पनिक आहेत, असं कोर्टानं म्हटलं आहे. तसेच त्यांच्यापासून इतरांच्या जीवाला धोका होता हा दावाही कोर्टाने फेटाळला आहे. कोर्टाने काढलेल्या या खरडपट्टीमुळे पोलिसांवर नामुष्की ओढवली आहे.
दरम्यान, कोर्टाने अटकपूर्व जामीन दिल्यानंतर संदीप देशपांडे आणि संतोष धुरी हे ज्या शिवतीर्थ येथून गायब झाले होते तिथेच प्रगट झाले. तसेच संदीप देशपांडे यांनी राज्य सरकारवर टीकेची तोफही डागली होती. "एक गोष्ट लक्षात घ्या. आज तुमचे दिवस आहेत. उद्या आमचे असतील. त्यामुळे राज्य सरकारनं आधी हे असलं सूडाचं राजकारण बंद करावं. त्यादिवशी जे घडलं ते सर्वांनी पाहिलं आहे. जर त्या पोलीस भगिनी माझ्या किंवा माझ्या कारचा धक्क्यानं पडल्या असतील असं जर फुटेज तुम्ही मला दाखवलंत तर मी राजकारण सोडून देईन. माझा किंवा कार्यकर्त्यांच्या धक्क्यानं त्या पडलेल्या नव्हत्या. तरीही माझ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला गेला. आम्ही काय चोर किंवा दहशतवादी आहोत का? आम्हाला पकडण्यासाठी इतका दबाव पोलिसांवर का आणला जात होता?", असा सवाल उपस्थित करत संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला होता.