बोगस कागदपत्रे सादर करुन भारतीय विमान प्राधिकरण आणि शासनाची फसवणूक करणा-या अंधेरीतील सनशाईन बिल्डर्स आणि डेव्हलपर्सच्या विकासक आणि विशारदावर एका महिन्यात फौजदारी कारवाई करण्याची घोषणा गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी विधान परिषदेत केली. अंधेरी येथे महाकाली दर्शन गृहनिर्माण संस्थेच्या जागेवर एसआरए योजनेंतर्गत इमारतीचे बांधकाम करताना विकासकाने बोगस कागदपत्रांच्या आधारे भारतीय विमान प्राधिकरणाकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळविले. याबाबतचा तारांकित प्रश्न प्रकाश बिनसाळे यांनी उपस्थित केला. सदर विकासकाने पालिकेने वितरीत केलेल्या प्रमाणपत्राच्या आकडेवारीत फेरफार केले आणि त्या आधारावर अधिक मजल्याची इमारत उभारण्यासाठी विमान प्राधिकरणाकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळवल्याचे गृहराज्य मंत्री वायकर यांनी मान्य केले. सदर प्रकरणी विकासकाला विमान प्राधिकरणाकडून नव्याने ना हरकत प्रमाणपत्र सादर करण्यासाठी चार महिन्याचा अवधी देण्यात आला आहे. तसे न केल्यास अनधिकृत ठरलेले मजले पाडण्याची कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे वायकर यांनी सांगितले.
सनशाइन बिल्डर्सवर महिनाभरात फौजदारी कारवाई
By admin | Published: March 19, 2015 12:56 AM