Join us

मुंबईतील गुन्हेगारीजगत हादरण्याची चिन्हे

By admin | Published: October 27, 2015 1:47 AM

कुख्यात गुन्हेगार छोटा राजन याला झालेली अटक ही मुंबईतील गुन्हेगारी जगताला हलवून सोडणारी असेल, अशा शब्दांत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली

मुंबई : कुख्यात गुन्हेगार छोटा राजन याला झालेली अटक ही मुंबईतील गुन्हेगारी जगताला हलवून सोडणारी असेल, अशा शब्दांत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. त्याचवेळी, राजनच्या जीविताला विशेषत: त्याला न्यायालयांमध्ये हजर करताना दाऊदच्या हस्तकांकडून मोठा धोका असल्याचे अधिकाऱ्यांचे मत असल्याने त्याच्या सुरक्षेचे नवे आव्हानही मुंबई पोलिसांना पेलावे लागणार आहे. छोटा राजनची अटक सूचक असून, त्यातून ‘जे पेराल ते उगवेल’ हा स्पष्ट संदेश गुन्हेगारीजगतामध्ये दिला जाईल. तसेच मध्य आणि पूर्व उपनगरांमधील बांधकाम व्यवसायाला दिलासा देणारीही आहे, असे वरिष्ठ एका आयपीएस पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. राजनचे मुख्य आर्थिक हितसंबंध हे बांधकाम, दारूचे गुत्ते, बेटिंग व पायरसी धंद्यांत होते. राजनच्या अटकेचे काय परिणाम होतील याबद्दल बोलताना हा अधिकारी म्हणाला की, ‘‘चेंबूर, घाटकोपर, टिळक नगर आणि विक्रोळी आदी मध्य आणि पूर्व उपनगरांमध्ये राजनचा प्रभाव आणि खंडणीखोरी लक्षात घेता बांधकाम व्यवसाय सुरू करणे सहजसोपे नाही अशी अनेक डेव्हलपर्सची पोलिसांकडे तक्रार होती. आता या लोकांचे मनोधैर्य वाढेल. राजनचे अनेक साथीदार हे पोलिसांच्या रडारवरून दूर होते त्यांचे नाक व तोंड दाबणे पोलिसांना शक्य होईल. त्याशिवाय राजनने बेकायदा मार्गांनी गोळा केलेली संपत्तीही शोधून काढता येईल.’’राजन तुरुंगातून सूत्रे हलविण्यात कमी प्रभावशाली ठरेल, पण त्याचा उजवा हात डी. के. राव हा आजही तुरुंगातून सूत्रे हलवित असल्याचे समजते. छोटा राजनला सुरक्षित ठेवणे हा पोलीस आणि तुरुंगाच्या अधिकाऱ्यांसाठी मोठा काळजीचा विषय असेल. गुन्हेगारीजगतातील लोकांवर तुरुंगात हल्ले होणे चांगलेच परिचयाचे आहे. दाऊदच्या हस्तकांकडून तुरुंगात राजनवर व त्याला तुरुंगातून न्यायालयांत नेणे व तेथून तुरुंगात आणतानाही हल्ले होण्याचा धोका आहे.