Join us  

रासायनिक कंपन्यांमध्ये अपघातसत्र सुरूच

By admin | Published: May 27, 2016 12:56 AM

डोंबिवली औद्योगिक विभागातील रासायनिक कंपन्यांमध्ये अपघातांचे सत्र सुरूच आहे. त्याचा प्रत्यय पुन्हा आला. खंबाळपाडा परिसरातील ‘सनबीन मेनोकेम’ ही रासायनिक कंपनी असो अथवा एमआयडीसीतील

- प्रशांत माने, कल्याण

डोंबिवली औद्योगिक विभागातील रासायनिक कंपन्यांमध्ये अपघातांचे सत्र सुरूच आहे. त्याचा प्रत्यय पुन्हा आला. खंबाळपाडा परिसरातील ‘सनबीन मेनोकेम’ ही रासायनिक कंपनी असो अथवा एमआयडीसीतील ‘नारकेम’ हा रंग बनवणारा कारखाना असो, त्यांना २०१३ मध्ये भीषण आग लागली होती. ‘नारकेम’ कंपनीच्या आगीत रंग बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल भस्मसात झाला होता. ‘फाइन आॅर्गनिक केमिकल’लाही मोठ्या प्रमाणावर आग लागली होती. तर, ‘केपस्टार’ या रासायनिक कंपनीला लागलेल्या आगीत एक कामगार ठार, तर पाच कामगार जखमी झाले होते. डिसेंबर २०१३ मध्ये कल्याण-शीळ मार्गावरील दावडीनाक्यालगत असलेल्या एका भंगाराच्या गोदामात स्फोट झाला होता. या दुर्घटनेत तीन जण ठार, तर तीन जण जखमी झाले होते. या स्फोटाची तीव्रता इतकी भीषण होती की, या स्फोटात भंगार गोदामातील दोन ते तीन टन वजनाचे अवशेष आजूबाजूच्या पाच ते सहा किलोमीटरच्या परिसरात फेकले गेले होते. डिसेंबर २०१४ मध्येही एमआयडीसी फेज-१ मधील ‘ओरेक्स फार्मा लिमिटेड’ या औषध कंपनीला भीषण आग लागली होती. या कंपनीतील रसायनांचा साठा असलेल्या ड्रमचे एकामागून एक असे सात ते आठ स्फोट झाले होते. स्फोटाच्या आवाजांनी आजूबाजूचा परिसर दणाणून गेला होता. यात शिवनारायण विश्वकर्मा हा कामगार जखमी झाला होता. आजघडीला एमआयडीसीत सुमारे ४५० कंपन्या आहेत. त्यापैकी २२५ रासायनिक कंपन्या आहेत. या कंपन्यांमुळे दरवर्षी आगी लागण्याच्या दोन ते तीन घटना घडतात.