Join us

गंभीर गुन्ह्यातील सराईत गुन्हेगारांना अटक, समतानगर पोलिसांची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2020 1:59 AM

पिस्तुलाचा धाक दाखवत दरोडा टाकण्याच्या उद्देशाने आलेल्या चौघांना समतानगर पोलिसांनी गुरुवारी अटक केली.

मुंबई : पिस्तुलाचा धाक दाखवत दरोडा टाकण्याच्या उद्देशाने आलेल्या चौघांना समतानगर पोलिसांनी गुरुवारी अटक केली. त्यांच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल असून उपनगरात लाखोंचे सोने त्यांनी लंपास केल्याचे उघड झाले आहे.रमाशंकर उर्फ पप्पू भगत (२७), वहाजुद्दीन अन्सारी (३८) आणि रिझवान कुरेशी (३४) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत़ ते उत्तर प्रदेशचे राहणारे आहेत. काही जण दरोडा टाकण्याच्या उद्देशाने कांदिवलीत येणार असल्याची माहिती समतानगर पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक रासकर यांना मिळाली. त्याबाबत त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू कसबे यांना कळविले. कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली रासकर आणि पथकाने कांदिवली पूर्वच्या अशोकनगर परिसरात सापळा रचला. या सापळ्यात तिघे आरोपी अडकले. त्यांच्या अंग झडतीत १० ते १२ लाखांचे दागिने, दोन गावठी कट्टे, वीस जिवंत काडतुसे तसेच अन्य सामान पोलिसांना सापडले. हे सोने त्यांनी मालाड, कांदिवली, मीरा रोड परिसरात दरोडा टाकून मिळवल्याचे प्राथमिक चौकशीत उघड झाले आहे.कुरेशी आणि अन्सारीवर खुनाचा गुन्हा दाखल असून त्यांनी आठ वर्षे शिक्षाही भोगली आहे. कुरेशीला उत्तराखंडमध्ये फरार घोषित करण्यात आले आहे. मालवणीत राहणारा नौशाद अन्सारी याने त्यांना दरोडा टाकण्यासाठी मुंबईत बोलावल्याचेही चौकशीत उघड झाले आहे.