'गृहखाते अपयशी ठरल्याने गुन्हेगार निर्ढावले'; मुंबई लोकलमधील घटनेवरुन सुप्रिया सुळे आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2023 12:55 PM2023-06-30T12:55:45+5:302023-06-30T13:02:09+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षा आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील या घटनेवरुन सरकारवर निशाणा साधला आहे.
मुंबई: काही दिवसांपूर्वी सीएसएमटी-पनवेल लोकलमध्ये अत्याचाराची घटना ताजीच असताना आता पुन्हा एकदा मुंबईतीललोकल महिलांसाठी सुरक्षित नसल्याचे समोर आले आहे. पश्चिम रेल्वेवरील ग्रॅन्ट रोडजवळ लोकलमध्ये २४ वर्षीय तरुणीची छेडछाड, अश्लिल बोलून शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार घडल्याचं समोर आलं आहे.
तरुणाविरोधात मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही तरुणी मालाडला राहते. ती गेल्या शुक्रवारी रात्री कामानिमित्ताने चर्नी रोडला जात होती. ग्रॅन्ट रोड स्थानकाजवळ येताच तरुणाने तिची छेड काढण्याचा प्रयत्न केला. तरुणीने आरडाओरडा केला, परंतू लोकलचा वेग कमी होताच त्याने उडी मारून पलायन केले. या तरुणाने तिच्याशी अश्लिल चाळे, वक्तव्ये केली. हे प्रकरण गेल्या आठवड्यातील शुक्रवारचे आहे. तर बुधवारी तरुणीने पोलीस ठाण्यात तक्रार दिली. आरोपीचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सदर घटनेवर मुंबईसह राज्यातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षा आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील या घटनेवरुन सरकारवर निशाणा साधला आहे. हा अतिशय संतापजनक प्रकार आहे. मु़ंबईच्या उपनगरीय रेल्वेची सुरक्षाव्यवस्था नेमकी कशी आहे? रेल्वेची प्रवाशांच्या सुरक्षाव्यवस्थे बाबतची उदासिनता आणि राज्याच्या गृहखात्याची निष्क्रियता या गोष्टींना कारणीभूत आहे. गृहखाते सपशेल अपयशी ठरल्याने गुन्हेगार निर्ढावले आहेत. या घटनेला कारणीभूत असलेल्या व्यक्तीवर कठोर कारवाई करण्याची गरज असल्याची मागणी सुप्रिया सुळेंनी केली आहे.
राज्याची राजधानी असलेली मुंबई सुरक्षित मानली जाते. मुंबईत रात्री कधीही महिला लोकल ट्रेन एकटी प्रवास करु शकते. तसेच अनेकवेळा महिला, तरुणी एकटी प्रवास करताना दिसूनही येते. रात्री महिलांच्या सुरक्षिततेसाठी त्यांच्या डब्यात एक पोलीस कॉन्स्टेबलही तैनात असतात. मात्र या घटनेमुळे लोकल गाड्यांमधील महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या काही दिवसांत राज्यात महिलांवरील अत्याचारात झालेली वाढ चिंताजनक आहे.