Join us

अन् ते चक्क पोलिसांनाच गेले बनावट खडे विकायला...

By मनीषा म्हात्रे | Published: January 03, 2024 9:01 PM

किंमती खड्यांचे आमिष दाखवत जाळ्यात ओढणाऱ्या टोळीला अटक, माटुंगा पोलिसांची कारवाई

मुंबई: किंमती खडयांची विक्री करण्याच्या बहाण्याने नागरिकांची कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या टोळीला बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून बनावट खडेही जप्त करण्यात आले. पोलिसांनी ग्राहक बनून टोळीशी संपर्क साधून त्यांना जाळ्यात ओढले. 

मागील काही दिवसांपासून किंमती खड़े विक्री करण्याच्या बहाण्याने फसवणुक करणारी एक टोळी मुंबईत सक्रीय असल्याची माहिती पोलीस उप आयुक्त प्रशांत कदम यांना मिळाली होती. ही टोळी २ तारखेला दादर रेल्वे स्टेशन परिसरातील स्वामी नारायण मंदिराजवळ वावरत असल्याचे समजताच माटुंगा पोलीस ठाण्याच्या पथकाने ग्राहक बनून टोळीला जाळ्यात ओढले. आरोपींनी पोलिसांच्या हाती किंमती खडे देत व्यवहार सुरू केला. पोलिसांनी सापळा रचून सहा जणांना अटक केली. 

पालघरच्या संजुर हबीब खान (५८), जितेंद्रकुमार मिश्रीलाल ब्राम्हण (५०, राजस्थान ), प्रकाश हरकिशनदास टेलर (४९, सुरत), मुंबईतील शैलेश सुभाष चव्हाण (४५ ), भालचंद्र पोपट तिलोर उर्फ दिपेश( ४७) आणि मोहंमद इरफान अब्दुल कय्युम शेख (४३) याला अटक करण्यात आली आहे.

आरोपींच्या झडतीत विविध रंगाचे व आकाराचे निलम, रूबी, पुष्कराज, ओपल याप्रकारचे किंमती खडे मिळुन आले आहेत. या आरोपींकडे चौकशीत या खडयांची किंमत ही सुमारे ३ ते ४ कोटी रुपये असल्याचे लोकांना सांगुन त्यांची फसवणुक करतात. या खडयांबाबत बाजार मध्ये तपासणी केली असता सदरचे खड़े हे बनावट असल्याचे व खोटे असल्याचे माहिती मिळाली आहे. या आरोपींविरुद्ध माटुंगा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवत सहा जणांना अटक केली आहे 

तुमचीही फसवणूक झाली का? 

या टोळीने अशाप्रकारे अनेकांची फसवणुक केल्याचा संशय आहे. त्यानुसार, तुमचीही फसवणूक झाली असल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस उप आयुक्त प्रशांत कदम यांनी केले आहे.

टॅग्स :मुंबई